दातृत्त्व दाखविलेल्या खासगी इमारतींच्या मालकांची पालिकेकडे मागणी
महापालिकेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
पुणे – करोना विषाणूच्या काळात रुग्णांच्या विलगीकरणासाठी महापालिका प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या काही इमारतींच्या मालकांनी आता वापरलेल्या सुविधांचे भाडे मागण्याला सुरुवात केली आहे. आधी दातृत्त्व दाखवले आणि नंतर मोबदला मागितला, असा हा प्रकार झाल्याने, याबाबत मार्गदर्शन करावे, असे साकडे पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना घातले आहे. यामध्ये एका संस्थेने दोन इमारतींच्या भाड्यापोटी दोन कोटी रुपये भाडे मागितले आहे तर अन्य एक मंगलकार्यालय चालक असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.
करोना विषाणूच्या संसर्गाची साखळी रोखण्यासाठी रुग्ण आणि संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या इमारतींबरोबरच खासगी इमारतीही ताब्यात घेतल्या आहेत. आजमितीला शहरात एकाच वेळी 15,500 रुग्णांचे विलगीकरण आणि उपचारांसाठीची सुविधा उभारण्यात आली आहे. यातील अनेकांनी दातृत्त्व भावना दाखवत स्वत: या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत.
यामध्ये प्राधान्य देताना महापालिका प्रशासनाने जेथे स्वतंत्र रूम्स, बेडस्च्या, टॉयलेटस् सुविधेला प्राधान्य दिले. मागील तीन महिन्यांत इमारतींचा या कामासाठी चांगला उपयोग झाला. दरम्यान, आता या इमारती आणि सुविधांच्या वापराबाबत संबंधित संस्था आणि जागा मालकांनी सरकारी नियमानुसार आणि दरानुसार मोबदला द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे. तसेच प्रामुख्याने वीज बिलासह प्रत्येक रुग्णासाठी बेड आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ही मागणी करण्यात आली आहे.
सिंहगड रस्त्यावरील एका संस्थेने त्यांच्या इमारत वापराबद्दल सरकारी नियमाप्रमाणे मोबदल्याची मागणी करणारे पत्र दिले आहे. तसेच एक पत्र मंगल कार्यालय चालकाने दिले आहे. वीज वापराचा खर्च देणे योग्य आहे; परंतु अन्य सुविधांच्या वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मागितले आहे. त्यांच्याकडून सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– राजेंद्र मुठे, महापालिकेचे उपायुक्त