पुणे – वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गाला अडथळा होऊ नये, यासाठी बांधण्यात आलेल्या “अंडरपास’ला वन्यजीवांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मार्च ते डिसेंबर 2019 दरम्यान केलेल्या निरीक्षणामधून तब्बल 5,540 वन्यप्राण्यांनी या अंडरपासचा वापर केला असून, यामध्ये 11 वाघांचादेखील समावेश आहे. त्यामुळेच वन्यजीव प्रदेशातून जाणाऱ्या महामार्ग प्रकल्पासाठी “अंडरपास’हा एक चांगला उपाय होऊ शकतो, असे मत अभ्यासकानी व्यक्त केले आहे.
“एनएच-44′ महामार्गावर नागपूर ते शिवनीदरम्यान 50 ते 750 मीटरचे नऊ अंडरपास बांधण्यात आले आहेत. हे भारतातील पहिलेच “अंडरपास’ आहेत. याच्या उपयुक्तततेबाबत अभ्यास करण्यासाठी “भारतीय वन्यजीव संस्थान’च्या (डब्लूआयआय) संशोधकांनी मार्च ते डिसेंबर 2019 दरम्यान कॅमेरा टॅपच्या माध्यमातून या अंडरपासमधून जाणाऱ्या प्राण्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. या नोंदीनुसार “अंडरपास’ चा वापर 18 प्रजातींचे वन्यजीव करत असल्याची नोंद वन्यजीव संशोधकांनी केली आहे.
महत्त्वाच्या नोंदी मिळाल्या
या नोंदीमध्ये एकूण 5,540 छायाचित्रे मिळाली असून त्यामधील 89 छायाचित्रे वाघांची आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये 70 चितळ आणि जंगली कुत्रे, मुंगुस, सांबर, रानमांजर, आणि रानडुक्कर या छोट्या प्राण्यांची 5,381 छायाचित्रे मिळाली आहेत. कान्हा ते पेंच राष्ट्रीय उद्यानादरम्यानचा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी बांधण्यात आलेले हे अशाप्रकारचे पहिलेच “अंडरपास’ आहेत, अशी माहिती डब्लूआयआय’चे संशोधक बिलाल हबीब यांनी त्यांच्य अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे दिली आहे.