नुकसानीची पाहणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करा : ना. विखे

राहाता  – पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना गावपातळीवर पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा. प्रसंगी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर नुकसानीची पाहणी करण्यासाठी करा, अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत दिल्या.

मागील पंधरा दिवसांत सरासरीपेक्षा जादा झालेल्या पावसाने तालुक्‍यात कापूस, सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंत्री विखे यांनी शिर्डी मतदारसंघातील चिंचपूर, कोल्हार भगवतीपूर येथे अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी केली. गोगलगाव येथील आत्महत्या केलेले शेतकरी रवींद्र लक्ष्मण मगर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. राहाता येथे शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत नुकसानीचा आढावा घेतानाच ना. विखे पाटील यांनी नुकसानीच्या सुरू असलेल्या पंचनाम्याबाबत अधिकारी, पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या सूचना जाणून घेतल्या.

याप्रसंगी सभापती हिराबाई कातोरे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, शिर्डी नागरपालिकेच्या नगराध्यक्षा अर्चना कोते, डॉ. राजेंद्र पिपाडा, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, उपसभापती बबलू म्हस्के, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे आदी याप्रंगी उपस्थित होते. ना. विखे म्हणाले, पचनाम्याची जबाबदारी अधिकारी आणि गावपातळीवर काम करणारे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांची आहे. तसेच पंचनामे करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या सूचना कृषी व महसूल विभागाला दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.