नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष अंतर्गत, पाच वैद्यकीय शाखांमधील तज्ञ डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. देशातील जनता निरोगी ठेवण्याची, आयुष क्षेत्राची दीर्घ परंपरा असून आज “कोविड-19′ सारख्या आजाराचा सामना करण्यात या शाखांची भूमिका अधिकच महत्वाची आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुसार काम करत ह्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आणि वैद्यकीय काळजी घेण्याचा सल्ला जनतेला द्यावा, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. “घरच्याघरी योगाभ्यास’ हा उपक्रम सुरू करून, लोकांमधला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी आयुष मंत्रालयाचे कौतुक केले.
आयुषअंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शाखांच्या नावाखाली बनावट औषधोपचार आणि सिद्ध न करता येणारे दावे ओळखून ते रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आयुषचे शास्त्रज्ञ, आयसीएमआर, सीएसआयआर आणि इतर संशोधन संस्थांनी एकत्र येऊन पुरावे आणि तथ्यांच्या आधारावर एकत्रित संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. या आव्हानाचा सामना करण्यासाठी देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व शक्तींनी सज्ज राहणे ही काळाची गरज आहे, आणि आवश्यकता भासल्यास, आयुष क्षेत्रातील खाजगी डॉक्टरांची देखील मदत घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
आयुष क्षेत्रातील औषध उत्पादक कंपन्यांनी देखील अत्यावश्यक वैद्यकीय साधने आणि औषधे तसेच सॅनिटायझरची अतिरिक्त निर्मिती करावी, असा सल्ला मोदी यांनी दिला. या आजाराबाबत आणि त्यापासून घ्यायच्या काळजीबाबत जनजागृती करण्यासाठी टेलीमेडीसिनचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली. सामाजिक अंतर हाच या आजारावारील प्रभावी उपाय असून, त्याचा जोरदार आणि सातत्याने प्रसार-प्रचार करावा, असेही त्यांनी सांगितले.