कराची : करोना बाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने अतिरेक्यांचा माग काढण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा (गुप्त हेरगिरी तंत्रज्ञान) वापरली आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांनी करोनाविरूध्दच्या लढ्यात आयएसआय या गुप्तचर यंत्रणेचा वापर सरकार करत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. पाकिस्तानात करोनाचा कोप भलताच वाढला आहे.
याबाबतचा तपशील अधिकृतपणे जाहीर करण्यात आला नाही. मात्र, तेथील स्थानिक दैनिकांनी गुप्तचर खात्यातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या बातम्यांनुसार, जिओ फेन्सिंग आणि फोन मॉनिटरींग यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. या यंत्रणा मुख्यत: देशांतर्गत आणि परकीय अतिरेकी शोधण्यासाठी वापरल्या जातात.
जनजागृतीचा अभाव, भीती आणि बदनामीच्या भयाने लक्षणे दिसली तरी अनेक बाधित उपचार घेत नाहीत किंवा रुग्णालयातून पळून जातात. तर संपर्कात आलेले अनेक जण स्वयंविलगीकरणाचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे या यंत्रणांचा प्रणावी वापर करोना बाधित शोधण्यासाठी करण्यात येत आहे, असे एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे. या मुळे लपलेले बाधितही शोधण्यात यश येत असल्याचे त्यांनी सांगितले.