आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर

दिलेश समुद्र

आपल्या रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग असले तरी ते माहिती पुरविणारे एक साधन आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि कुठे करायचा याची हुशारी आपल्याकडे असायला हवी. विचार करा, की मोबाइलमध्ये असणारे जीपीएस उपकरण तुम्हाला चुकीच्या दिशेला अथवा ठिकाणी घेऊन गेले तर किंवा त्या उपकरणाने तुम्हाला कोणतीच माहिती पुरवली नाही तर? अशा वेळी या समस्येतून बाहेर पडण्याचा विचार आपल्याला करता यायला हवा.

” न्यूयॉर्क टाईम्समधील कॅन अ कम्प्युटर रिप्लेस युवर डॉक्‍टर? या लेखात डॉ. एलिझाबेथ रोझेन्थाल यांनी म्हटले आहे. सन 2013 मध्ये घेण्यात आलेल्या हेल्थ अफेअर्सच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, 10 पैकी 8 फिजिशियन्स हे रुग्णांची माहिती साठविण्यासाठी आधुनिक वैशिष्ट्ये असणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डस्‌चा म्हणजेच ईएमआर्सचा वापर करत आहेत. आरोग्य क्षेत्रात होणारा तंत्रज्ञानाचा प्रसार पाहता, केवळ डॉक्‍टर्स नाही, तर आरोग्य सेवा पुरवणाऱ्या अनेक संस्था व लोक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.

माहिती तंत्रज्ञानाचा आरोग्य सेवेतील वापर वाढत असला तरी एक्‍सेंचर कंपनीने देशातील डॉक्‍टरांच्या केलेल्या सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, वापर वाढला तर तंत्रज्ञानाच्या वापराने रुग्णांवरील उपचारांच्या गुणवत्तेत किती प्रमाणात वाढ होऊ शकते, याबद्दल डॉक्‍टर साशंक असतात. या सर्वेक्षणात उपचारांचा निर्णय घेण्यातील सुधारणा, वैद्यकीय चुका टाळणे आणि उपचारांमधील सुधारणा यांसारख्या 6 घटकांवर 2600 डॉक्‍टरांनी आपले मत नोंदविले.
सन 2012 च्या तुलनेत 2015 मध्ये अधिक संख्येने डॉक्‍टर या अभ्यासात सहभागी झाले असले, तरी तंत्रज्ञानाच्या वापराबद्दलची साशंकता आजही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.

यातून दुसरा निष्कर्ष असाही निघू शकतो की, उपलब्ध असणाऱ्या सुविधा आणि तंत्रज्ञानावर आधारित सिस्टिम्स योग्य असल्या, तरी त्याचा प्रत्यक्ष आणि प्रभावी वापर करणे डॉक्‍टरांना शक्‍य होत नाही. ज्यामुळे रुग्णांवरील प्रत्यक्ष उपचारामध्ये या सिस्टिम्सचा वापर केला जात नाही. याविषयी हॉस्पिटल्स आणि आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनीही इलेक्‍ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डस्‌चा म्हणजेच ईएमआर्सचा प्रभावी वापर न होण्यासाठी हेच कारण दिले.

डॉक्‍टर्स हे रुग्णांना सहकार्य करण्यास खूपच उत्सुक असतात आणि ते अशा प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित सिस्टमचा उपयोग करतात ज्यामुळे रुग्णांना त्याचा थेट लाभ होऊ शकेल. रुग्णांबद्दल, त्यांच्या मेडिकल हिस्टरीबद्दल सुयोग्य माहिती देणाऱ्या सिस्टिम्सचा वापर करण्यासाठी अनेक डॉक्‍टर उत्सुक असतात. अशा सिस्टिम्सच्या वापरामुळे रुग्णाचे योग्य निदान, त्यावर चांगले उपचार करणे याचबरोबर पुढील उपचारामध्ये होणाऱ्या चुका कमी करण्यास मदत होते.
या तंत्रज्ञानाचा आणखी एक उपयोग म्हणजे प्रत्येक रुग्णाची योग्य रेकॉर्डस्‌ ठेवून, उपचारांच्या नोंदी पारदर्शकपणे साठवता येतात आणि रुग्णाची प्रगती, उपचारांना मिळणार सकारात्मक प्रतिसाद यांची नोंद राहते.

चांगली रेकॉर्डस्‌ ठेवल्याने त्यांचा दीर्घकालीन लाभ डॉक्‍टर आणि रुग्ण दोघांनाही होताना दिसतो. वैद्यकीय क्षेत्रात लॅब्स, फार्मासिस्टस्‌ यांसारखे अनेक लोक इको सिस्टम केअर प्रोव्हायडर्स म्हणून काम करतात. अशा सर्व घटकांकडून आलेली रुग्णासंबंधीची माहिती एकत्र साठवून ठेवणे अशा इएमआर सिस्टिम्समुळे शक्‍य होते. एक्‍सेंचरने केलेल्या सर्वेक्षणातून असेही दिसून आले की, 70 टक्के डॉक्‍टरांचा असा विश्‍वास आहे की हेल्थकेअर आयटी सिस्टिममुळे ते पेशंटबरोबर घालवत असलेल्या वेळेची बचत होऊ लागली आहे.

अनेकदा डॉक्‍टर हे स्वतःच्या कामात गुंतलेले असल्यामुळे समजून घेण्यास कठीण व वेळखाऊ सिस्टिम्सचा वापर करण्यात ते उत्सुक नसतात. एक्‍सेंचरच्या सर्व्हेनुसार जवळजवळ 60 टक्के डॉक्‍टरांच्या मते कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारी ईएमआर सिस्टम ही वापरण्यास खूपच कठीण आहे. डॉक्‍टरांच्या वापरासाठी अशी सिस्टिम बनवावी लागेल, जी वापरण्यासाठी अतिशय सोपी आणि आजच्या स्मार्टफोनमध्येही वापरणे शक्‍य होईल. डॉक्‍टरांनी पूर्वी साठवलेली माहिती वापरून, ड्रॉपडाऊन मेनूज निवडून तसेच फोटोंमधून निवडण्याची अधिकाधिक संधी देणाऱ्या सिस्टिमची निर्मिती करणे महत्त्वाचे ठरेल.

एपोक्रेट्‌सच्या सर्व्हेनुसार असे दिसून आले की सुमारे 86 टक्के डॉक्‍टर कामाच्या वेळी स्मार्टफोनचा वापर करतात. यातील जवळपास 50 टक्के डॉक्‍टर हे मोबाइल, लॅपटॉप्स/कॉम्प्युटर्स आणि टॅब्लेट्‌ अशा तीनही गोष्टींचा वापर करतात. डॉक्‍टरांना तंत्रज्ञानाची जाण असून, तंत्रज्ञावर आधारित मेडिकल उपकरणे किंवा मोबाईल ऍप वापरणे सोईचे असते. त्यामुळेच मोबाईलवर वापरण्यासाठी योग्य आणि सुटसुटीत मांडणी असणाऱ्या ईएमआर सिस्टिम्स बनविल्या गेल्या, तर त्यांचा वापर अधिक प्रमाणात होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.