गरज नसतानाही रेमडेसिवीरचा वापर

इंजेक्‍शनचा तुटवडा नाही; परंतु मुबलकही नाही : एफडीए


रुग्णालयांना सूचना देणार

पुणे – रुग्ण गंभीर नसताना आणि गरज नसताना केला जाणारा रेमडेसिवीरचा वापर यामुळेच हे इंजेक्‍शन कमी पडत असून, त्याचा तुटवडा नाही; परंतु ते मुबलकही शिल्लक नाही. ते अगदी “कट टू कट’ पुरत असल्याचे स्पष्टीकरण अन्न आणि औषध प्रशासनातर्फे (एफडीए) देण्यात आले आहे. याच्या वापराबाबत सोमवारी पुन्हा एकदा रुग्णालयांना सूचना देण्यात येणार आहेत.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या पुणे विभागातून उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात रेमडेसिवीर पुरवण्यात येते. प्रशासनाकडे असलेल्या 12 हजार व्हायल्सपैकी
5 हजार 700 व्हायल्स पुणे जिल्ह्यात वितरित झाल्या आहेत; तर उर्वरित सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात वितरित झाल्या आहेत. ग्णसंख्या वाढत आहे, तशी रोजच्या रोज कंपन्यांकडे याची मागणी नोंदवली जात आहे.

कंपनीकडून काही स्टॉक नागपूर , भिवंडी डेपो येथेही जातो. त्या त्या डेपोतून तो महाराष्ट्रात वितरित केला जातो. सध्या काही ठिकाणी रेमडेसिवीर संपले तर त्यांना चार पाच तासांत किंवा दिवस संपायच्या आत ते पोहोचवले जात आहे. अगदीच तुटवडाही नसल्याचे अन्न आणि औषध प्रशासन सहायक आयुक्त एस. व्ही. प्रतापवार यांनी सांगितले.

मागील वर्षी रुग्णसंख्या वाढ होती त्यावेळी रेमडेसिवीरचा जेवढा वापर होत नव्हता तेवढा यावेळी होत आहे. सध्याच्या परिस्थितीत रुग्णसंख्या वाढली असली तरी त्या तुलनेत गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. असे असतानाही रेमडेसिवीर देण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आल्याचे प्रतापवर म्हणाले. आरोग्य विभागाने रेमडेसिवीरच्या वापराबाबत आणि ते कोणत्याप्रकारच्या रुग्णाला द्यायचे याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत, ज्याला रुग्णालयांनी पाने पुसली आहेत. ज्याचा एचआरसिटी स्कोअर नऊच्या पुढे आहे आणि ज्याचे ऑक्‍सिजन डाऊन होत चालले आहे; त्यांना ते देणे आवश्‍यक आहे. आताची परिस्थिती अशी आहे की, रुग्णालयात बाधित दाखल झाला तर त्याला लगेचच रेमडेसिवीर द्यायला सुरुवात करतात. त्यामुळेच ते पुरत नसल्याचे प्रतापवार म्हणाले.

रुग्णालये आमच्या नियंत्रणाखाली येत नाहीत. त्यामुळे सिव्हिल सर्जन आणि “डीएचओ’मार्फत (जिल्हा आरोग्य अधिकारी) सर्व रुग्णालये आणि कोविड सेंटर्स यांना रेमडेसिवीरच्या वापराबाबत सूचना करण्यात येणार आहेत. सर्रास वापर करण्याऐवजी ज्याला गरज आहे त्यांनाच ते देण्यासंदर्भातील या सूचना आहेत. सर्रास वापर केला तर कितीही डोस आणले तरी ते पुरणार नाहीत आणि ज्याला खरीच गरज आहे, त्याला ते मिळणार नाहीत.
– एस. व्ही. प्रतापवार, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.