कोल्हापूर: तावडे हॉटेल येथील महापालिकेच्या ताब्यात असणारी जागा ट्रक टर्मिनलसाठी वापरात आणावी, अशा सूचना पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज दिली.
ट्रक टर्मिनलसाठी तावडे हॉटेल येथील जागेची, बस टर्मिनलसाठी शिरोळी जकात येथील जागेची तसेच व व्हीनस कॉर्नल येथील गाडी अड्डाची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.
सतेज पाटील म्हणाले, 23 एकर पैकी तीन ते साडेतीन एकर महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या साडेतीन एकर जागेची साफ सफाई जेबीसीच्या सहाय्याने करावी. या जागेत असणारे पीक निघाल्यानंतर तिची साफसफाई करुन जागा वापरात घ्यावी. या जागेवर किमान 100 ट्रक थांबू शकतील. त्यासाठी अनुदान उपलब्ध करुन दिले जाईल.
शिरोळी जकात नाका येथील बस टर्मिनलसाठी असलेली जागा जेसीबी व रोलरने साफसफाई करुन घ्यावी व बस टर्मिनलसाठी जागा वापरात आणावी, असे ही ते म्हणाले. व्हीनस कॉर्नल येथील गाडी अड्ड्याची पाहणीही त्यांनी केली. येथे काम चालू झाल्यांनतर येथील गाळेधारकांची पर्यायी व्यवस्था 23 एकर जागेत होवू शकते, असेही ते म्हणाले.