पुणे : ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांना शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याच्या सूचना आहेत. त्यामध्ये भाषण, फलक, योजनांची माहिती तसेच गावाची नावेदेखील मराठीतच करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा गौरव फक्त कागदोपत्री न करता, त्याचा प्रत्यक्षात अवलंब करण्याची ग्रामविकास विभागाची कार्यपद्धती कौतुकास्पदच म्हणावी लागेल.
शासकीय कामकाजात मराठीचा वापर करण्यासाठी तसेच विधिमंडळ मराठी भाषा समितीने केलेल्या शिफारशींनुसार, ग्रामविकास विभागासाठी मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक आहे. या अधिकाऱ्याच्या शिफारशीनुसार, या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मराठीचा वापर करण्याच्या सूचना आहेत.
नव्या अध्यादेशानुसार सर्वसामान्य नागरिकांना योजनांची माहिती देताना, दूरध्वनीवरील संभाषण मराठीतच होईल, याची खबरदारी घ्यावी. याशिवाय दैनंदिन कामकाजात सर्व नमुने, परिपत्रके, परवाने, नोंदवह्या, प्रपत्रे, अधिसूचना, अहवाल, बैठकांची कार्यवृत्ते, पत्रांवरील शेरे, टिप्पण्या हे सर्व मराठीतच असावीत.
कार्यालयातील नामफलक, अधिकाऱ्यांची नावे मराठीतून लिहिताना अद्याक्षरेदेखील मराठीच असावीत. विविध निमंत्रण पत्रिका मराठीतच, तर अपवादात्मक स्थितीत मराठी व इंग्रजी भाषेत पत्रिका छापाव्यात. पदभरती परीक्षा, विकासकामांच्या निविदा, संकेतस्थळावरील माहिती फक्त इंग्रजी नव्हे, तर मराठीतही उपलब्ध करण्याच्या सूचना आहेत.
– तुषार रंधवे