अकोले – घाटघर येथील प्रकल्पग्रस्तांचे 25 वर्षानंतरही आदर्श पुनर्वसन झाले नाही. त्यांच्या हक्कांच्या मागण्या प्रलंबित आहेत. मागील आमदार पिता- पुत्रांनी याची कधीही दखल घेतली नाही. त्यांच्या जवळील ठराविक पिलावळीचे सोयीस्कर पुनर्वसन केले व घाटघर प्रकल्पग्रस्तांचा खेळणी म्हणून वापर केला, असा आरोप आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केला.
प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी प्रकल्पस्थळी ठिय्या आंदोलन छेडले, याप्रसंगी आमदार लहामटे बोलत होते.आ. लहामटे म्हणाले की, यापूर्वी आपण व अशोकराव भांगरे यांनी मिळून प्रकल्पग्रस्तांच्या हक्काच्या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला. त्यांना न्याय मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे.
तर अशोकराव भांगरे म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या रास्त आहेत. त्यांना न्याय मिळायला हवा व अडवलेले पाणी केवळ वीजनिर्मिती साठी न वापरता प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित शेतीसाठी द्यावे किंवा लव्हाळवाडी के टी वेअरची दुरुस्ती करुन तो तलाव प्रकल्पग्रस्तांच्या ताब्यात द्यावा. आमचा प्रमुख प्रलंबित मागण्यासाठी गेल्या 22 वर्षापासून लढा सुरू आहे. आम्ही 5 फेब्रुवारी 2019 रोजी आंदोलन छेडले.
त्यावेळी लेखी आश्वासन दिले गेले. नंतर 5 ऑगष्ट 2019 रोजी बैलपोळा सणाच्या दिवशी भर पावसात आंदोलन केले. मात्र शासनाने आजपर्यंत आमचे खेळणे केले आहे. आता आम्ही विनंती करणार नाही. आम्हाला संगमनेर न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मोबदला द्यावा. घरटी एका माणसाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी दिली जावी.
त्यावेळी असलेले तत्कालीन पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांनी 142 पदे मंजूर केले होते. पैकी 114 जणांना नोकरी मिळाली. उर्वरित 28 जणांना अद्याप नोकरी नाही. कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्याचे वचन पूर्ण झाले नाही व शेतीसाठी पाणी नाही मिळाले तर आता रक्त सांडले तरी बेहतर! आम्ही मागे हटणार नाही. जेलमध्ये डांबले तरी चालेल. आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत. आम्हाला नक्षलवादी बनायला लावू नका. असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
याबाबत त्यांनी अधिकारी वर्गाला जाब विचारला. भांगरे यांनी औरंगाबाद खंडपीठात जाण्याची आमची ताकद नाही. परंतु विद्युत निर्मिती प्रकल्प बंद पाडण्याची आमच्या मनगटात ताकद असल्याचा इशारा दिला. त्याला देविदास खडके, धोंडीबा सोंगाळ, लक्ष्मण गांगड,लक्ष्मण पोकळे, सुरेश खडके यांनी जोरदार पाठिंबा दिला.
तर यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, ठाणे पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता नरेंद्र महाजन, घाटघर जलविद्युत प्रकल्प उपविभागीय अधिकारी जे. पी. पाटील, के. डी, रोटे, मंडलधिकारी राजेंद्र पवार यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त भर पावसात उपस्थित होते.