खेड, (वार्ताहर)- शेतकरी कुटुंबाच्या खासगी वहिवाटीच्या शेतातून बळजबरीने नवीन रस्ता करण्यासाठी गावातील ठराविक नागरिक आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी संगनमताने घाट घातला आहे.
कायद्याचा व पोलीस प्रशासनाचा गैरवापर करून रस्त्याची कसलीही नकाशा नोंद नसताना बळजबरीने शेतात नवीन रस्ता करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता या शेतकरी कुटुंबाकडून उपोषण करण्यात येणार आहे.
सुलभा सचिन खाडे व सचिन बबन खाडे यांच्या मालकीचे ताजू येथे (गट क्र. २५९) हे खासगी क्षेत्र आहे. या क्षेत्रातून यापूर्वी कसलाही रस्ता नव्हता व नाही.
याउलट खाडे यांच्या संबंधित क्षेत्राच्या दक्षिण बाजूने उत्तरेकडे ताजू गावापर्यंत गेलेला इंग्रजांच्या काळापासून नकाशात व पूर्वापार वापरात रस्ता आहे. याच रस्त्याने ताजू, अंबालिका कारखाना, बारडगाव सुद्रिक, राशीन तसेच वाड्यावस्त्यांची वाहतुक सुरू आहे.
खाडे यांच्या शेतात सध्या अनेक शेतीपीकेही आहेत. मात्र गावातील काही लोक राजकीय आकस व काही कारणास्तव प्रशासनाला चुकीची माहिती देऊन व खरी वस्तुस्थिती लपवून सदरचा रस्ता खाडे यांच्या शेतातून जातो, अशी चुकीची माहिती देऊन प्रशासनाकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच सा.बां.उपविभागाचे उपअभियंते अनधिकृत आणि पोलीस मदतीचा चुकीच्या पद्धतीने आधार घेऊन नवीन रस्ता करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
शेतातून रस्ता नसताना व नवीन रस्ता करू नये, यासाठी खाडे यांनी अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने कागदपत्रांची पडताळणी करून अवैधरीत्या काम करण्यास मनाई हुकूमही दिला आहे.
असे असले तरी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे दिलेला मानसिक त्रास तसेच खासगी क्षेत्रात घातलेला रस्त्याचा घाट याविरोधात आता उपोषण करण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी खाडे कुटुंबीयांनी केली आहे.
ज्या जमिनीतून बळजबरीने नव्याने रस्ता न्यायचा आहे, त्या जमिनीचे भू-संपादन नाही, जमिनीची मोजणी नाही, कसलेही नोटीस नाही. शिवाय तो रस्ता नकाशातही नाही.
तरीही गट विकासाधिकारी आणि पं. स.बांधकाम विभागाचा उपअभियंता कशाच्या आणि कुणाच्या आधारावर खासगी जमिनीत नवीन रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत? तसे पुरावे असतील तर दाखवा आणि मग रस्ता करा, असे जाहीर आव्हान खाडे यांनी दिले आहे.