पुणे – विविध कार्यक्रम, समारंभ, लग्न सोहळ्यावेळी प्रखर बीम लाइट वापरले जातात. पण, यापुढे लोहगाव विमानतळाच्या 15 किलोमीटर परिसरात असे लाइट वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. ही बंदी पुढील दोन महिन्यांसाठी आहे. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा आदेश पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.
लोहगाव नागरी विमानतळ व भारतीय वायुदल विमानतळ येथे दिवसा व रात्री विविध विमान कंपन्या, वायुदलाची विमाने आणि हेलिकॉप्टर्स उड्डाण करतात व उतरतात. रात्रीच्यावेळी वैमानिकांना दिशा दाखवण्यासाठी रन-वेवर व एटीसी टॉवरकडून संकेतासाठी लाइटचा वापर करण्यात येतो.
पण, विमानतळ परिसरात विविध कार्यक्रमांवेळी आकाशामध्ये प्रखर बीम लाइटचा वापर केला जात असल्याचे वायुदलाने निदर्शनास आणून दिले. बीम लाइटमुळे वैमानिकाचे डोळे दिपून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरी विमानतळ व वायदुल विमानतळाच्या 15 किलोमीटर अंतराच्या वायुक्षेत्र परिसरात सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत बीम लाइटचा वापरास मनाई केली आहे.