नवी दिल्ली – कोविड -19 च्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज आयुर्वेद आणि योगावर आधारित नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल आभासी पध्दतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत जारी केले.
कोविड-19 च्या व्यवस्थापनाच्या प्रोटोकॉलमध्ये आयुर्वेद आणि योगशास्त्राचा समावेश करण्यासाठी “आयसीएमआर’चे माजी महासंचालक डॉ. व्ही.एम. कटोच यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल तयार केला असून क्लिनिकल डेटावर आधारित शिफारसी सादर केल्या.
हे निष्कर्ष, औषधांचे संभाव्य फायदे आणि सुरक्षितता दर्शविणारे असून कोविड 19 वरील राष्ट्रीय कृती दल आणि संयुक्त देखरेख समूहासमोर सादर केले गेले आणि त्यानंतर नीती आयोगाच्या शिफारशींनुसार प्रोटोकॉलमध्ये विकसित केले गेले.
आयुष मंत्रालायमार्फत लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासंदर्भातील मार्गदर्शन आतापर्यंत लोकप्रिय झाल्याबद्दल डॉ. हर्ष वर्धन यांनी मंत्रालयाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -19 साथीच्या काळात योग्य व्यवस्थापनासाठी आयुष मंत्रालयासोबत सल्लामसलत करण्यावर भर दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भातील हे प्रोटोकॉल केवळ कोविड व्यवस्थापनातच नाही तर आधुनिक काळात समस्यांचे निराकरण करण्यासाठी पारंपारिक ज्ञान सुसंगत बनवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
गुडुची, अश्वगंधा, आयुष-64 यासारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या आयुर्वेदिक वनौषधींचा कोविडवरील उपचारांमध्ये समावेश केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर आयुर्वेदाकडे फारसे लक्ष गेले नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच्या महत्वावर भर दिला असे ते पुढे म्हणाले.