पुणे – वाहतूक पोलीस दंड करू नये, आपल्या नावाचे चलन येऊ नये म्हणून अनेक जण हेल्मेटचा वापर करतात. हेल्मेटबाबतची मार्गदर्शक तत्त्वे न पाळल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक असते. विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. केवळ “सक्ती’साठी हेल्मेट घातले जाते; परंतु बहुतांश जणांचे हेल्मेट “सर्टिफाईड’ देखील नसतात. वाहतूक पोलिसांच्या बंधनासाठी हेल्मेट वापरण्यापेक्षा, प्रत्येकाने स्वत:च्या सुरक्षिततेचा विचार करत हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.
असे असावे हेल्मेट :
हेल्मेट नामांकित कंपनीचे असावे.
हेल्मेटला आयएसयू, डीओटी, ईसीई, एसएनईएलएलचे सर्टिफिकेशनचे प्रिंट असावे. स्टीकर नसावा.
हेल्मेट वाहनचालकाला व्यवस्थित (फिट) बसणारे असावे. डोक्याच्या आकारानुसार हेल्मेट असावे.
संपूर्ण चेहरा झाकणारे म्हणजेच “फुल फेस’ हेल्मेट असावे.
रस्त्यावरील विक्रेत्यांकडे डुप्लीकेट हेल्मेट असण्याची शक्यता अधिक असते.
हेल्मेट घातल्यावर “चिनस्ट्रॅप’ लावणे बंधनकारक आहे. यामध्ये दोन बोटांचे अंतर असणे आवश्यक आहे.
हेल्मेटची खरेदी ऑनलाइन करू नये.