US Deports Indian Migrants : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने 104 भारतीय प्रवाशांना पुन्हा मायदेशी परत पाठवले होते. आता जवळपास 119 भारतीय नागरिकांना घेऊन निघालेले अमेरिकेचे दुसरे विमान अमृतसर विमानतळावर दाखल झाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्यांदा 100 पेक्षा अधिक भारतीयांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आले आहे. हे नागरिक बेकायदेशीररित्या व कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना अमेरिकेत राहत होते, असे सांगितले जाते.
या 119 भारतीयांपैकी 100 जण पंजाब आणि हरियाणातील आहेत. पंजाबमधील 67, हरियाणातील 33, गुजरातमधील 8, उत्तर प्रदेशमधून 3, तर गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानमधून प्रत्येकी 2 आणि हिमाचल प्रदेश व जम्मू-कश्मीरमधून प्रत्येकी 1 नागरिकांचा समावेश आहे. भारतीय नागरिक मोठी स्वप्न घेऊन अमेरिकेत जात आहेत, परंतु, कठोर इमिग्रेशन नियमांमुळे त्यांना परतावे लागत आहे.
परत पाठवण्यात आलेल्या या भारतीय नागरिकांच्या दुसऱ्या गटात 4 महिला आणि 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, ज्यामध्ये एका 6 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहेतसेच, जवळपास 150 पेक्षा अधिक नागरिकांना घेऊन आणखी एक विमान अमेरिकेतून उड्डाण घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच 104 भारतीय प्रवाशांना पुन्हा मायदेशीर परत पाठवले आहे. या लोकांना हातात बेड्या आणि पायात साखळ्या बांधून आणले गेले होते. यावरून विरोधकांनी सरकारवरही जोरदार टीका केली होती. विमानतळावर या नागरिकांची माहिती तपासून त्यांना त्यांच्या घरांकडे जाण्यास परवानगी देण्यात आली.