US War Plans For Yemen Leaked | काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने येमेनमधील हूती बंडखोरांवर हवाई हल्ले केले होते. मात्र, बलाढ्य अमेरिकेचे एक मोठी चूक आता समोर आली आहे. अमेरिकेची येमेनमधील हुती बंडखोरांवर हल्ला करण्याची गुप्त योजना लीक झाली आहे. नकळतपणे एका पत्रकाराला सिग्नल चॅट ग्रुपमध्ये सहभागी केल्याने अमेरिकेची युद्ध योजना फुटली.
ट्रम्प प्रशासनातील 18 वरिष्ठ अधिकारी खासगी सिग्नल चॅट ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये युद्ध रणनीतीवर चर्चा करत होते. या ग्रुपमध्ये चुकून द अटलांटिक मासिकाचे मुख्य संपादक जेफरी गोल्डबर्ग यांना अॅड करण्यात आले. त्यामुळे हल्ल्याबाबतची गुप्त माहिती समोर आली. ही माहिती समोर आल्याने अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तसेच, यामुळे ट्रम्प सरकारवर टीका करेली जात आहे.
जेफरी गोल्डबर्ग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, त्यांना चुकून Houthi PC Small Group नावाच्या सिग्नलवरील चॅट ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. या ग्रुपमध्ये वरिष्ठ अधिकारी येमनेवरील अमेरिकेच्या हल्ल्यांच्या रणनितीवर चर्चा केली जात होती.
या ग्रुपमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स, संरक्षण सचिव पीट हेगसेथ, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यासारखे मोठे अधिकारी सामील होते. या ग्रुपवर येमेनमधील हुती बंडखोरांवर करण्यात येणाऱ्या हल्ल्याची रणनीती, वापरण्यात येणारे शस्त्रे आणि संभाव्य लक्ष्यांबाबत चर्चा करण्यात आली होती होती.
या प्रकरणावर व्हाइट हाऊसचे प्रवक्ते ब्रायन ह्यूजेस यांनी देखील माहिती. त्यांनी हे चॅट खरे असल्याचे मान्य केले. तसेच, चुकून एका अनोळखी क्रमांकाला चॅटमध्ये जोडण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी दावा केला की, यामुळे अमेरिकेच्या सैन्य मोहिमेला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. तसेच, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचे म्हटले. मात्र, अशाप्रकारे हल्ल्याशी संबंधित योजना लीक झाल्याने ट्रम्प प्रशासनावर टीका केली जात आहे.