जेरुसलेम – इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील अतिरेकी गटांमधील युद्धबंदी अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेरिका गाझाच्या पुनर्बांधणीस मदत करणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांची भेट घेल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी ही माहिती दिली.
हिंसाचार पुन्हा सुरू होऊ नये म्हणून मानवतावादी दृष्टिकोनातून या गंभीर परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे. मात्र, गाझावर नियंत्रण ठेवणाऱ्या हमास या अतिरेकी गटाला या फेरबांधणीचा कोणताही फायदा होणार नाही, याची अमेरिकेकडून काळजी घेतली जाईल, असेही ब्लिंकेन म्हणाले. तसेच आपल्या भूभागाचे संरक्षण करण्याचा इस्रायलला अधिकार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
तब्बल 11 दिवस चाललेला संघर्ष इजिप्तच्या मध्यस्थीमुळे थांबला आहे. या हिंसाचारात 250 जण ठार झाले असून, त्यापैकी बहुतांश जण गाझामधील आहेत. या युद्धबंदीचा आढावा घेण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांच्या तीन दिवसांचा मध्यपूर्वेतील दौऱ्याला सुरुवात झाली असून, पहिल्या दिवशी त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांची भेट घेऊन चर्चा केली. हमासबरोबर वाढलेल्या संघर्षाच्या वेळी इस्रायलच्या संरक्षण अधिकाराचे ठामपणे समर्थन केल्याबद्दल नेतान्याहू यांनी ब्लिंकेन यांचे आभार मानले आहेत.
जर हमासने शांतताभंग केला आणि इस्रायलवर हल्ला केला तर त्यांना खूप शक्तिशाली प्रत्युत्तर दिले जाईल. हमासच्या रॉकेट हल्ल्यांपासून इस्रायलचे रक्षण करणाऱ्या इस्रायलच्या “आयर्न डोम’ प्रणालीची डागडुजी करण्याबाबत चर्चा केली असल्याचेही नेतान्याहू यांनी सांगितले. संघर्ष संपल्यानंतर पहिल्यांदाच गाझाच्या खासगी क्षेत्रासाठी इंधन, औषध आणि अन्नपदार्थांच्या पुरवठ्याला या प्रदेशात प्रवेश देत असल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.