वॉशिंग्टन – अफगाणिस्तानात गेले अनेक वर्षे जो रक्तरंजीत हिंसाचार सुरू आहे त्याला पायबंद घालण्यासाठी अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार केला जाणार असून येत्या शनिवारी कतार मध्ये त्यावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे असे सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानातील शांततेसाठी या कराराला विशेष महत्व आहे. अनेक अडथळ्यानंतर हा करार होणार आहे.
या करारानंतर अमेरिका अफगाणिस्तानातील आपले हजारो सैनिक माघारी घेणार आहे. अमेरिकेने 11 सप्टेंबर 2001 मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. तेव्हापासूनच अमेरिकेचे जवान त्या भूमीवर तालिबानशी लढत होते. या संबंधात बोलताना अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी सांगितले की तालिबानची तयारी असेल तर आमचीही या करारावर स्वाक्षरी करण्याची तयारी आहे.
हा करार येत्या शनिवारी होऊ शकतो. आम्ही तेथून आमचे सैन्य मागे घेणार असलो तरी नेमके किती सैन्य मागे घ्यायचे याचा निर्णय तेथील स्थितीवर अवलंबून असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. तालिबानने आम्हाला अफगाणिस्तानातील हिंसाचार कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार त्यांच्या हिंसक कारवायांमध्ये घट झालेली दिसून आली आहे असेही त्यांनी नमूद केले.