वॉशिंग्टन – चीनने भारताच्या सीमेजवळ प्रत्यक्ष ताबारेषेजवळ बळाचा वापर करून “जैसे थे’स्थितीमध्ये बदल करण्याच्या प्रयत्नावर अमेरिकेच्या सिनेटने निषेधाचा ठराव मांडला आहे. या मुद्दयावर मुत्सद्यांच्या माध्यमातून तोडगा काढण्याची मागणीही या ठरावातून करण्यात आली आहे.
जॉन कॅरीन आणि मार्क वॉर्नर या सिनेटरनी हा ठराव मांडला होता. चीनच्या धोक्यापासून भारताने आपल्या दूरसंचार पायाभूत सुविधांचे रक्षण केल्याबद्दल भारतीय लष्कराचे कौतुक या ठरावामध्ये करण्यात आले आहे. याशिवाय भारताबरोबरच्या “चतुर्भुज सुरक्षा संवाद’सारख्या द्विपक्षीय आणि बहुपक्षीय भागीदारीला पाठिंबाही दिला गेला आहे. गेल्या आठवड्यात सिनेटमध्ये ठराव मांडण्यात आला आणि अधिक विचारासाठी सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीकडे पाठविण्यात आला आहे.
पूर्व लडाखमधील वेगवेगळ्या ठिकाणांवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये 5 ऑगस्टपासून कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. गलवान खोऱ्यामध्ये 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष झाल्यावर ही तणावाची स्थिती आणखीनच बिघडली होती. या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचे 20 जवान शहिद झाले होते. तर चीनच्या सैन्याची झालेल्या जीवितहानीचा तपशील उघड करण्यात आला नव्हता.