अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन भारतात दाखल

नवी दिल्ली  – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन मंगळवारी भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी दिल्लीत दाखल झाले. दोन्ही देशांमधील संबंध आणखी बळकट होण्यासाठी त्यांचा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.

ब्लिंकन उद्या (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतील. त्याशिवाय, ते परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्‌द्‌यांवर व्यापक चर्चा करतील. अमेरिकेत सत्ताबदल होऊन चालू वर्षीच्या प्रारंभी बायडेन प्रशासनाच्या हाती सुत्रे गेली. त्या घडामोडीनंतरही अमेरिकेकडून भारताला दिले जात असलेले महत्व अधोरेखित झाले आहे.

परराष्ट्र मंत्री म्हणून ब्लिंकन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मात्र, ब्लिंकन यांच्याआधी अमेरिकी संरक्षण मंत्री लाईड ऑस्टीन आणि अमेरिकेचे विशेष दूत जॉन केरी यांच्या रूपाने बायडेन प्रशासनातील दोन उच्चपदस्थांनी भारताला भेट दिली. दरम्यान, ब्लिंकन यांच्या दौऱ्याच्या अजेंड्यावर करोनाविरोधी लढा, अफगाणिस्तानमधील सुरक्षा स्थिती आणि हिंद-प्रशांत विभागातील सहकार्याचा विस्तार आदी मुद्दे असतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.