वॉशिंग्टन: अमेरिकेने चीनसोबत वाढत चाललेल्या तणावादरम्यान नव्या निर्बंधांची घोषणा करून पुन्हा एकदा ड्रॅगनवर हल्लाबोल केला आहे. अमेरिकेने तिबेटमध्ये विदेशींना जाण्यापासून रोखणाऱ्या चिनी अधिकाऱ्यांच्या व्हिसावर निर्बंध घातले आहे. एवढेच नव्हे तर चीनच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी तिबेटच्या स्वायत्ततेला पुन्हा एकदा समर्थन दर्शविले आहे.
अमेरिकेचे हे पाऊल वॉशिंग्टन आणि बीजिंग दरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण संबंधात कटूता वाढण्यास आणखी एक कारण बनू शकते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेओ यांनी याबाबत सांगितले की, आम्ही तिबेटमध्ये अमेरिकन नागरिकांना प्रवेशाची मुभा देणाऱ्या अमेरिकन कायद्यानुसार चीनमध्ये सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या काही अधिकाऱ्यांसहीत अनेक चिनी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करीत आहोत.
पॉम्पेओ यांनी “रेसिप्रोकल एक्सिस टू तिबेट’ कायद्यानुसार चिनी अधिकाऱ्यांच्या एका समूहाच्या व्हिजावर निर्बंध घातल्याची घोषणा केली आहे. हे चिनी अधिकारी तिबेटमध्ये विदेशींना जाण्यापासून रोखण्याचे काम करतात.