वॉशिंग्टन – करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधांची अमेरिकेला त्वरित निर्यात करावी, ही औषधे भारताने आम्हाला वेळेवर न पुरवल्यास भारताला प्रत्युत्तर द्यावे लागेल, अशी थेट धमकीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली आहे.
गेल्या रविवारीच ट्रम्प यांनी मोदींना फोन करून या औषधांची मागणी केली होती. पण त्याची पूर्तता अजून न झाल्याने त्यांनी आज या धमकीच्या भाषेचा वापर केला आहे.
ट्रम्प यांनी आज व्हाईट हाऊन मधून बोलताना सांगितले की, मला हा प्रत्युत्तराचा (रिटालिएशनचा) निर्णय घ्यायला आवडणार नाही. भारताने विदेशात ही औषधे निर्यात करण्यास बंदी घातली आहे. या संबंधात मी स्वत: मोदींशी फोनवर बोललो आहे. आमच्यात चांगली चर्चा झाली; पण ते आम्हाला औषधे देणार आहेत की नाहीत हे अजून समजलेले नाही. गेली अनेक वर्षे ते आमच्याकडून निर्यात झालेल्या मालावर पैसे कमवत राहिले आहेत, त्याचा लाभ घेत राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय आम्हाला आर्श्चयकारक वाटतो आहे. त्यांनी तसे मला स्पष्टपणे सांगायला हवे होते. ते आम्हाला या औषधांचा पुरवठा करणार नसतील तर ठीक आहे, पण आम्हालाही त्यावर प्रत्युत्तर द्यावेच लागेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे थेट करोनावरील ओैषध नाही. ते मलेरियासाठी वापरले जाणारे औषध आहे, पण करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकासाठी हे औषध करोना रोखण्यासाठी उपयुक्त ठरते आहे. त्यामुळे या औषधाला सध्या मागणी आहे. म्हणूनच अमेरिकेनेही हे औषध मागवले आहे. भारताने गेल्या 25 मार्चपासून या औषधाच्या निर्यातीला बंदी घातली आहे. केवळ मानवतावादी भूमिकेतूनच काही विशिष्ट प्रसंगी या औषधांच्या निर्यातीला अनुमती देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.