अग्रलेख : लोकशाहीचे रक्षण

“मी आपल्या घटनेचे रक्षण करणार. मी अमेरिकेचे रक्षण करणार. सत्तेचा आणि ताकदीचा नाही, तर शक्‍यतांचा विचार करणार. स्वहितासाठी नव्हे तर जनहितासाठी काम करणार आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे लोकशाहीचे रक्षण करणार,’ असे अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. बायडेन यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. ते अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष झाले आहेत. 

अपेक्षेनुसार त्यांनी अगोदरच्या सरकारचे बरेच निर्णय बदलले आहेत. बरेच निर्णय बदलणार आहेत. तसे करणे त्यांच्यासाठी आवश्‍यक आहे. त्याचे कारण म्हणजे अनन्यसाधारण परिस्थितीत त्यांनी देशाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांच्यापुढे समस्यांचा प्रचंड डोंगर आहे. एका अहंकारी आणि अनप्रेडीक्‍टेबल व्यक्‍तीकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. या व्यक्‍तीने प्रथेप्रमाणे बायडेन यांना निरोपाचे पत्र तर पाठवले. मात्र, बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. पद जाताच त्यांनी थेट फ्लोरिडाकडे रवाना होणे पसंत केले. राजकारणात आणि देशकारणात मतभेद असतात. मात्र मनभेद असता कामा नये असे सातत्याने म्हटले जाते. 

किमान भारतात तरी असेच सांगितले जाते. भारतात टोकाची मतभिन्नता आहे. पराकोटीचा संघर्ष आहे. प्रचंड आक्रमक आणि गलिच्छ वार प्रचारसभांमधून केले जातात. मात्र, जेव्हा सत्तेचे हस्तांतरण केले जाते तेव्हा काही शिष्टाचार पाळला जातो. किमान तसे भासवले तरी जाते. विशेषत: केंद्रीय राजकारणात हे संकेत पाळले गेले आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्षाचे नाते असते. ते असायलाही हवे. मात्र जेव्हा राष्ट्र म्हणून काही करायची अथवा बदलाची स्थिती येते तेव्हा त्या संघर्षाला बाजूलाही ठेवले जाते. तसे अमेरिकेत झाले नाही. किंबहुना गेल्या काही दिवसांत अमेरिकेत जे आणि जसे घडले तसे पूर्वी कधीच झाले नव्हते. स्वातंत्र्य, वर्णद्वेषाचा विरोध, मानवाधिकार आणि लोकशाही या मूल्यांची तेथील राज्यकर्त्यांनी भलामण केली. जनमताचा रेटाच असा होता की त्यावरून कोणत्याही सत्ताधाऱ्याला उजवीकडे अथवा डावीकडे पाहता आले नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प याला अपवाद ठरले. त्यांच्या लहरी स्वभावाने त्यांनी गेल्या काही काळात जे काही केले ते निस्तरण्यातच बायडेन यांना सुरुवातीचे काही दिवस खर्ची करावे लागणार आहेत. 

अमेरिका एकसंध होती असे वर्षानुवर्षे दिसले. तसेच पाहिले गेले. मात्र, बायडेन यांच्या कालच्या स्थानापन्नतेच्या वेळी चित्र वेगळे होते. हिंसा, तणाव, संचारबंदी आणि अभेद्य सुरक्षा व्यवस्थेच्या वातावरणात त्यांनी देशाची सूत्रे स्वीकारली. असेही म्हटले जाते की ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक अन्य स्वतंत्र व्यवस्थाही सक्रिय केली गेली होती. याचाच अर्थ अत्यंत अविश्‍वासाच्या वातावरणात हे सत्तांतर झाले आहे. एकसंध वाटणारी अमेरिका दोन विचारसरणींमध्ये विभागली गेली आहे. एक ट्रम्प यांना म्हणजे त्यांच्या कथित राष्ट्रवादाला मानणारा वर्ग तर दुसरा अमेरिकेची पारंपरिक मूल्ये आणि विचारधारा मानणारा वर्ग अशी ही विभागणी झाल्याचे दिसते आहे. 

पंधरवड्यापूर्वी संसदेत ट्रम्प समर्थकांनी धुडगूस घातला. ते विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाईल. तसे भासवलेही जाईल. मात्र, त्या घटनेने अमेरिकेची प्रतिमा जी काळवंडली आहे ती उजळायला कदाचित पुढची अनेक दशके जाऊ द्यावी लागतील. आपल्याच लोकांच्या रक्षणासाठी ज्यांना तैनात करण्यात आले होते त्यांच्यावरच लक्ष ठेवण्यासाठी अन्य कोणाला तरी बोलवावे लागते ही कृती कोणत्याही राष्ट्राला भूषणावह नसते. एक देश म्हणून ते किती अविश्‍वासाच्या गर्तेत लोटले गेले आहेत त्याचेच हे प्रतीक असते. वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेनुसार निवडणुका घेतल्या गेल्या. मात्र, त्याचा कौल स्वीकारण्यास सर्वोच्च पदावरील व्यक्‍ती नकार देते. तो निकाल रद्द करण्यासाठी सगळे अस्त्र शस्त्र वापरते. अखेर आपल्याच लोकांना आपल्याच लोकांच्या विरोधात लढण्यासाठी चिथावणी देते, प्रक्षुब्ध करते. 

लोकशाहीची मंदिरे म्हणून उभारल्या गेलेल्या संस्थांवर हल्ले केले जातात आणि हे सगळे अमेरिकेत होते. हे सगळे भयावह वास्तव आहे. ते कोरले गेले आहे. ते मिटवणे बायडेन यांना शक्‍य होणार नाही. मात्र किमान त्यामुळे जी हानी पोहोचली आहे त्याची तीव्रता तरी त्यांना कमी करावी लागणार आहे. व्यक्‍तिस्वातंत्र्य हा नव्या जगाचा नारा आहे. समान हक्‍क आणि अधिकार, विचार मांडण्याचे व त्यांच्या रक्षणासाठी लढण्याचा अधिकार आणि सौहार्दपूर्ण वातावरणात बंधुत्वाच्या भावनेने जगण्याचा अधिकार हाच गेल्या शतकभरातील किंवा त्याही अगोदर लढल्या गेलेल्या विविध स्वातंत्र्यलढ्यांचा सार आहे. ती मूल्ये स्वीकारली गेल्यामुळे जग आज राहण्यायोग्य ठिकाण तरी आहे. अमेरिकेत वर्णद्वेष गेल्या काही काळात प्रचंड फोफावला. पूर्वीही तो होताच. मात्र, त्याला अलीकडच्या काळात राजमान्यता मिळाली. कायदे रक्षकांकडूनच वर्ण आणि वंशाच्या आधारावर हत्या झाल्या. त्यातून समाजातील दुहीची भावनाच वाढीस लागली. कोणत्याही राष्ट्राच्या जडणघडणीत अथवा उभारणीत कोणा एका विशेष वर्गाचे योगदान नसते. मानव म्हणून जन्माला आलेला प्रत्येक व्यक्‍ती आपला वाटा त्यात उचलत असतो आणि त्यामुळे राष्ट्राचा गाडा पुढे जात असतो. 

लोकशाहीची चौकट यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. तिलाच नख लावण्याचा नव्हे तर उखडून टाकण्याचा प्रयत्न केला तर परिणाम गंभीर संभवतात. करोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट, प्रचंड बेरोजगारी या जगाला भेडसावणाऱ्या समस्या अमेरिकेपुढेही आहेत. अशा वेळी नियोजन करून लोकांना योग्य दिशेने नेण्याचे काम राष्ट्रप्रमुखाला करावे लागते. ट्रम्प यांच्या कार्यकाळात ते अभावानेच दिसले. कमालीची बेफिकीरी आणि अक्‍कलशून्य नियोजन आणि फक्‍त राष्ट्रवाद नव्हे तर ट्रम्पवाद हीच काय त्यांच्या चार वर्षांच्या राजवटीची फलनिष्पत्ती. 

जगात कष्टाने आणि योग्यतेने मिळवलेले अग्रस्थानही निसटून जाण्याच्या बेतात आहे. चीन असेल किंवा इराण यांच्याशी धरसोडीचे धोरण राबवत निर्माण केलेले प्रश्‍न आणि आव्हाने ही बायडेन यांना वारसा म्हणून आलेली आहेत. त्यातून त्यांना अमेरिकेचे जहाज बाहेर काढावे लागणार आहे. अमेरिका अनेक संस्थांचा आणि मूल्यांचा आश्रयदाता होता. काही गुणदोष त्यांना एक राष्ट्र म्हणून चिकटलेले आहेत. मात्र, एक संपन्न, समर्थ आणि लोकशाहीच्या मूल्यांचे कदर करणारे राष्ट्र म्हणूनही त्यांनी जगात लौकीक संपादन केला होता. तो एका बेधुंद राजकारण्याच्या सत्तांध नाट्यामुळे धुळीस मिळाला आहे. तो लौकीक पुन्हा प्राप्त करावा लागणार आहे. 

आज अमेरिकेत लोकशाहीची अवस्था बिकट असल्याची कबुली खुद्द बायडेन यांनी दिली आहे. मात्र, हे करणारे कोण आहेत त्यांनाही आपण ओळखतो. पण यामधूनच लोकशाही किती बहुमूल्य आहे याचे पुन्हा आपल्याला नव्याने भान आले आहे. वंशवाद, राष्ट्रवाद आणि भय निर्माण करून आपल्याला वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या शक्‍ती नव्या नाहीत. मात्र, आपण त्यांच्यापासून अमेरिकेचे संरक्षण करू, असा विश्‍वास बायडेन यांनी व्यक्‍त केला आहे. लोकशाहीच्या विजयासाठी आणि भल्यासाठी तोच आवश्‍यक आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.