न्यूयॉर्क : संपूर्ण जग करोनामुळे हतबल झाले आहे. या विषाणूंवर लवकरात लवकर लस शोधून काढणे एवढा एकच उद्देश जगासमोर असल्याचे दिसत आहे. त्या दृष्टीने सर्व देश प्रयत्न देखील करत आहेत. मात्र या सर्वात अमेरिका करोनावरील लस संशोधनात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
जगात करोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. त्यामुळे इथे लस शोधण्याचे काम जास्त गतीने सुरु असल्याचे दिसत आहे. कारण अमेरिकेने आधीपासूनच २० लाख लसींची निर्मिती करुन ठेवली आहे. सर्व चाचण्यांच्या निकषावर ही लस यशस्वी ठरली तर थेट ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली.
करोनावरील लस संशोधनासंदर्भात काल आमची बैठक पार प़डली. आम्ही खरोखरच खूप चांगले काम करत आहोत. आम्ही लवकरच चांगली बातमी देऊ शकतो. लस विकसिक करण्यामध्ये आम्ही प्रचंड प्रगती केली आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
करोनावरील उपचारांमध्येही आम्ही चांगले काम करत आहोत’ असे ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने ‘ऑपरेशन वार्प स्पीड’ची योजना आखली आहे. त्या अंतर्गत लस विकसित करण्यासाठी पाच कंपन्यांची निवड केली आहे. यात मोडर्ना, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मर्क अँड कंपनी, एस्ट्राजेनेका, या पाच कंपन्या आहेत. निवडण्यात आलेल्या कंपन्यांना अमेरिकन सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत मिळेल. यामुळे क्लिनिकल चाचण्या तसेच संशोधनाला वेग मिळेल. कुठल्या कंपनीने लस उत्पादन सुरु केले आहे? त्याची माहिती ट्रम्प यांनी दिलेली नाही.
अमेरिकेच्या मोर्डना कंपनीने बनवलेली लस पहिल्या स्टेजमध्ये यशस्वी ठरली आहे. आठ जणांच्या चाचणीतून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मोर्डना कंपनीने mRNA-1273 लसीची दुसऱ्या स्टेजची चाचणी सुरु केली आहे. जुलै महिन्यात अंतिम स्टेजची चाचणी सुरु होईल.