माद्रिद – जागतिक टेनिसमधील स्पेनचा अग्रमानांकित टेनिसपटू राफेल नदाल याने ग्रॅण्डस्लॅम टेनिसमधील मानाच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून (यूएस ओपन) माघार घेतली आहे.
करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने माध्यमांना सांगितले आहे. मार्च महिन्यापासून जगभरात करोनाचा धोका वाढल्याने अनेक स्पर्धा रद्द झाल्या. ग्रॅण्डस्लॅम टेनिसमधील सर्वांत मानाची समजली जात असलेली विम्बल्डन स्पर्धाही रद्द झाली. त्यानंतर दुसरा मानांकित नेवाक जोकोविच व तिसरा मानांकित रॉजर फेडरर यांनीही या स्पर्धेतून अंग काढून घेतल्याचे जाहीर केले होते आता त्यात नदालचीही भर पडल्याने आयोजकांसमोर चिंता वाढली आहे. जगभरातील करोनाचा धोका अद्याप नियंत्रणात आलेला नसताना धोका पत्करून स्पर्धेत सहभागी होणे शक्य नाही, असेही नदाल म्हणाला.
सुमित नागलला थेट प्रवेश
भारताचा उदयोन्मुख टेनिसपटू सुमित नागल याला 31 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळाला आहे. जागतिक टेनिस एकेरी क्रमवारीत नागल 127 व्या क्रमांकावर असला तरीही त्याने गेल्या मोसमापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सरस कामगिरी केल्यामुळे त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे. भारताचा आणखी एक गुणवान खेळाडू प्रजनेश गुणेश्वरनला मात्र या
स्पर्धेसाठी पात्र होण्यास अपयश आले.