नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेवर टेहळणी करण्यासाठी भारतीय लष्कराला अमेरिका आणि इस्राईलची ड्रोन मिळणार आहेत. अमेरिकेची मिनी आणि इस्राईलची हेरॉन ही ड्रोन भारतीय लष्कराला मिळणार असल्यामुळे चीनच्या संभाव्य् कुरापतींवर लक्ष ठेवणे आता भारतीय लष्कराला अधिक सुकर होणार आहे.
हेरॉन ड्रोन खरेदीची प्रक्रिया सुरू असून या संदर्भातील करार डिसेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे. भारतीय लष्कराकडे सध्या असलेल्या ड्रोनपेक्षा हेरॉन ड्रोन अत्याधुनिक आहेत. त्यामुळे लडाखमध्ये या ड्रोनचा विशेष उपयोग होणार आहे.
केंद्र सरकारने लष्कराला आपत्कालिन काळासाठी 500 कोटी रुपयांपर्यंतच्या संरक्षण साहित्याच्या खरेदीचे अधिकार प्रदान केले आहेत. लडाखच्या परिसरामध्ये चीनच्या सैन्याबरोबर असलेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये संरक्षण सज्जतेची गरज लक्षात घेऊन या विशेष अधिकारांतर्गत हेरॉन ड्रोनची खरेदी लष्कराकडून केली जाणार आहे.
याशिवाय अमेरिकेकडून मिनी ड्रोनही खरेदी केली जाणार असून ही ड्रोन पायदळाच्या बटालियन पातळीवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हातांनी नियंत्रित करायची ड्रोन आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वापरली जाणार आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
चीनच्या सीमेवर सध्या असलेला तणाव लक्षात घेता ही संरक्षण खरेदी केली जाणार आहे. यापूर्वी 2019 मध्ये भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवादी तळांवर “एअर स्ट्राईक’ केला होता, त्यानंतर भारतीय लष्करासाठी अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
या सुविधेअंतर्गत भारतीय नौदलाने अमेरिकेतील जनरल ऍटोमिका या कंपनीकडून दोन प्रिडेटर ड्रोन भाडेतत्वावर घेतले होते. हवाई दलाने देखील हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी आणि 70 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता असलेली हॅमर क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी याच विशेष अधिकारांचा उपयोग केला होता.