नवी दिल्ली – अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क वाढवली आहे. त्याचबरोबर प्राधान्याने व्यापार करण्याच्या देशातून भारताला वगळले आहे. सरकारने या अगोदर आम्ही जशास तसे उत्तर देऊ असे सांगितले होते.तरीही निर्णय अनेकदा लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र, आता सरकारने अमेरिकन आयातीवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या 29 उत्पादनांवर अतिरिक्त आयात शुल्क लावले जाणार असून यासंबंधीची अधिसूचना लवकरच काढली जाणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारने प्रथम अमेरिकन आयातीवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर वेळोवेळी त्याला मुदत वाढ देण्यात आली होती.
मात्र, दरम्यानच्या काळात अमेरिकेने भारतीय चर्चेला कसलाही सकारात्मक प्रतिसाद न देता एकतर्फी निर्णय घेतल्यानंतर आता भारताने अमेरिकेच्या वस्तूंवर ही आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.