काबुल : अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्य मोहिमेचा अखेर 19 वर्षे, 10 महिने आणि 25 दिवसांनी शेवट झालाय. तालिबानने अमेरिकेला 31 ऑगस्टपर्यंत मदत मोहिमेला मूदत देऊन देश सोडण्यास सांगितलं होतं.
त्यामुळे 31 ऑगस्टच्या शेवटापर्यंत अफगाणमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याची मोहिम चालेल असा अंदाज होता. मात्र, अमेरिकेने 30 ऑगस्टच्या रात्रीच अफगाणिस्तान सोडलं. यानंतर तालिबानने लगेचच अफगाणसाठी स्वातंत्र्य दिवस असल्याचं घोषित केलं. अमेरिकेने अफगाण सोडल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला विजय साजरा केला.
अमेरिकेच्या शेवटच्या 3 सी-17 विमानांनी 30 ऑगस्टला रात्री उरलेल्या अमेरिकन सैनिकांसह हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डान केलं. यासह अमेरिकेचं अफगाणमधील अस्तित्व संपलंय. हा अफगाणमधील युद्धाचा शेवट की नव्या युद्धाची आणि अनागोंदीची सुरुवात हे मात्र येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या तरी अफगाणमध्ये शरिया कायद्याच्या नावाखाली सर्वसामान्यांवर अनेक निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे अफगाणचं भविष्य सध्या तरी तालिबानी नियंत्रणात अंधारातच दिसत आहे.
पत्रकार मुराद यांनी अमेरिकेचे उरलेले सैनिकही अफगाण सोडून अमेरिकेला परतल्याचं सांगत हा येथील युद्धाचा शेवट असू शकतो, असं मत व्यक्त केलंय. मुराद म्हणाले, “अफगाणिस्तानमधील अमेरिकन सैन्याचं युद्ध 19 वर्षे, 10 महिने आणि 25 दिवस चाललं. अखेरच्या अमेरिकन सैनिकांनीही काळी वेळापूर्वी अफगाणिस्तान सोडले. आता युद्ध संपलंय.