वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने करोनाच्या विरोधातील मॉडर्नाच्या लसीलाही अनुमती दिली आहे. अमेरिकेत फायझर नंतर एक आठवड्याच्या आत मंजुरी मिळालेली ही दुसरी लस आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या बॉयलॉजिकल प्रॉडक्ट अडव्हायझरी समितीच्यावतीने या लसीची स्वतंत्रपणे वेैज्ञानिक चाचणी घेऊन आणि तपासणी करून या लसीला गुरूवारी 20 विरूद्ध 0 मतांनी मान्यता देण्यात आली आहे. आणिबाणीची बाब म्हणून ही मान्यता देण्यात आली आहे.
एम आरएनए-1273 असे या लसीचे वैज्ञानिक नाव आहे. लस उत्पादक कंपनीला अन्न व औषध प्रशासनाचा हा निर्णय कळवण्यात आला आहे. त्यानुसार त्यांनाही आता त्याच्या वितरणाची तयारी करावी लागणार आहे.
मॉडर्ना कंपनीचे सीईओ स्टीफन बान्सेल यांनी या अनुमती बद्दल अमेरिकेच्या प्रशासनाचे आभार मानले आहेत. आता अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल विभागाशी संपर्क करून आम्ही लसीच्या वितरणाची तातडीने तयारी करू असे त्यांनी नमूद केले.
मॉडर्ना लसीच्या तीन टप्प्यातील क्लिनीकल चाचण्यांची पुर्तता झाली असून या लसीची परिणामकारकता 94.1 टक्के इतकी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विशिष्ट तापमानात ही लस ठेवावी लागते त्यासाठी तिच्या ट्रार्न्स्पोर्टेशनसाठी व्यापक तयारी करावी लागणार आहे.
ही लस अमेरिकेच्या दुर्गम भागात पोचवण्याची आव्हानात्मक कामगीरी आता कंपनीला पार पाडावी लागणार आहे. त्यासाठी अमेरिकेच्या वैद्यकीय प्रशासन विभागाची मदत होणार आहे. या लसीला अनुमती देण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या सल्लागार समितीची जी बैठक झाली त्या बैठकीला डॉ. मिचेल कुरील्ला हे अनुपस्थित होते.
त्यांनी आपल्या अनुपस्थितीचे समर्थन करताना म्हटले आहे की, या लसीला अनुमती देण्याच्या प्रस्तावाच्या संबंधात जी भाषा वापरण्यात आली आहे त्याला आपली नापसंती होती. एखाद्या लसीला अशी सर्रास व बेदरकारपणे अनुमती देण्याची पद्धती आपल्याला मान्य नव्हती म्हणून आपण त्याठिकाणी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.