वाॅशिंग्टन – मतमोजणीदरम्यान उत्सुकता वाढत असताना उर्वरित राज्यांपैकी जॉर्जियामधील मतमोजणीद ज्यो बायडेन यांना आघाडी मिळाली आहे. शुक्रवारी सकाळी बायडेन यांनी जॉर्जियातील मतमोजणीत ट्रम्प यांना मागे टाकले.
विजयासाठी या राज्यात विजय मिळवणे ट्रम्प यांच्यासाठी अनिवार्य असताना ही आघाडी त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यातही जॉर्जिया हा रिपब्लिकन पक्षाचे प्राबल्य असलेला प्रांत असल्याने तेथे बायडेन यांना आघाडी मिळणे ट्रम्प यांची डोकेदुखी वाढवणारे ठरू शकते. आतापर्यंत जॉर्जियामधून बायडेन यांना सुमारे 1 हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
बुधवारी रात्रीपर्यंत जॉर्जियात बायडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा तब्बल 50 हजार मतांनी मागे होते. अजूनही या आघाडीच्या आधारे जॉर्जियातील निकाल कोणाच्या बाजूने लागू शकेल, हे सांगता येऊ शकत नाही. कारण अद्यापही हजारो मतपेट्या उघडून मतमोजणी होणे बाकी आहे. विशेषतः बायडेन ज्या भागांमध्ये आघाडीवर आहेत तेथील निर्णयही अद्याप प्रलंबित आहेत.
टपालाद्वारे आलेल्या मतांची मोजणी झाल्यावर बायडेन आघाडीवर असल्याचे आढळून आले आहे. कदाचित या ठिकाणच्या मतांची फेरमोजणी करायला लागू शकते, असा विश्लेषकांचा अंदाज अहे. जॉर्जियातील कायद्यानुसार जर बायडेन आणि ट्रम्प यांच्यातील मतांचा फरक अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी राहिला तर मतांची फेरमोजणी करण्याची विनंती केली जाऊ शकते.
पेनसिल्वेनियामध्ये ट्रम्प यांना 5 हजार मतांची किरकोळ आघाडी मिळाली आहे. मात्र बुधवारी रात्री ट्रम्प यांची आघाडी तब्बल 70 हजार मतांची होती. ती आता कमी झाली आहे. पण अजूनही कौल ट्रम्प यांच्याच बाजूने असल्याचे चित्र आहे.
बायडेन यांच्या नावार 264 आणि ट्रम्प यांच्याकडे 214 इलेक्टोरल व्होट जमा झाले आहेत. बायडेन 270 इलेक्टोरल व्होटच्या “मॅजिक फिगर’च्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांच्या या वाटेत आता जॉर्जियाचीही भर पडण्याची शक्यता आहे.
विस्कोन्सिन आणि मिशीगन येथील मतमोजणीचा कल ट्रम्प यांच्या दिशेने झुकू लागला आहे. त्यामुळे जॉर्जियातील विजय बायडेन यांच्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अद्याप नवाडा येथील मतमोजणीचे कल समजायचे आहेत.