अमेरिका-चीन यांच्या पुन्हा रंगणार सामना?; करोनाची माहिती चीनने लपवल्याचा बायडेन यांचा आरोप

न्यूयॉर्क : अमेरिकेने पुन्हा एकदा  करोनावरून चीनवर निशाणा साधला आहे. करोनाची उत्पत्ती कुठून झाली याचा तपास करण्यात आल्यानंतरही पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाकडून यासंदर्भातील महत्वाची माहिती लपवून ठेवली जात असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन  यांनी केला आहे. बायडेन यांच्या आरोपानंतर पुन्हा एकदा अमेरिका-चीन यांच्यात शाब्दिक युद्ध रंगणार असल्याचे दिसत आहे.

जो बायडेन यांनी एका वक्तव्यामध्ये करोनासंदर्भात आपण आपल्या सहकारी देशांसोबत काम करणं सुरु ठेवणार असल्याचे म्हटले आहे. परस्पर सहकार्याने काम करत राहिल्यास करोनासंदर्भात अधिक माहिती शेअर करण्यासाठी चीनवर दबाव निर्माण होईल असा विश्वास बायडेन यांनी व्यक्त केला आहे . या जागतिक साथीसंदर्भातील सर्व माहिती अगदी पारदर्शकपणे आपल्या सर्वांना उपलब्ध झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


“आजपर्यंत पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने पारदर्शकपणे माहिती देण्यास नकार दिलाय. तसेच करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही त्यांनी माहिती लपवून ठेवलीय,” असं बायडेन म्हणाले आहेत. यापूर्वीचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनीही अनेकदा चीनच करोनाच्या प्रादुर्भावासाठी जबाबदार असल्याचे आरोप केले आहेत. मात्र प्रत्येक वेळेस चीनने हे आरोप खोटे असल्याचा दावा केला. त्यामुळेच आता बायडेन यांच्या वक्तव्यानंतर चीनकडून उत्तर दिले जाईल असे सांगितले जात असून पुन्हा एकदा करोनावरुन या दोन महासत्ता आमने-सामने येण्याची चिन्हं दिसत आहेत.

करोनासंदर्भात प्रत्येक देशाने संपूर्ण माहिती आहे तशी देणे इतकीच सर्वांची अपेक्षा आहे. दुसरीकडे अमेरिकन गुप्तचर कम्युनिटीने करोनासंदर्भात योग्य माहिती मिळवण्यासाठी चीनचे सहकार्य सर्वात महत्वाचे असेल. मात्र असे असले  तरी बीजिंगमधून जागतिक स्तरावरील चौकशीमध्ये अडथळे निर्माण करण्याबरोबरच माहिती शेअर करण्यास विरोध करत आले आहे. तसेच यासाठी चीनने अनेकदा अमेरिका आणि इतर देश दोषी असल्याचे आरोप केले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.