बीजिंग- वॉशिंग्टन – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात आज बहुप्रतिक्षित शिखर परिषद झाली. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने या चर्चेदरम्यान मानवी हक्क, व्यापार, तैवान आणि भारत- प्रशांत क्षेत्रातील संबंधांसह विविध विषयांवर चर्चा झाली. बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांदरम्यान फोनवरून दोनवेळा चर्चा झाली होती. मात्र दूरदृश्य माध्यमातून ही पहिलीच सविस्तर चर्चा झाली. आज झालेली चर्चा दोन सत्रांमध्ये झाली आणि एकूण चर्चा तब्बल 3 तास चालली होती.
बायडेन आणि जिनपिंग यांनी परस्परांमधील संवाद अधिक चांगला होण्याच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर मूलभूत विषयांवरील आपली मते मांडली. तसेच दोन्ही देशांच्या सामायिक विषयांबाबतही आपली मते व्यक्त केली. रष्ट्रीय आणि व्यवहारीक पातळीवर चीनच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी बायडेन यांच्याकडून राजकीय नेतृत्व दर्शवले जाईल, अशी आशा शी जिनपिंग यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि चीनमधील संबंधांमध्ये खुला संघर्ष निर्माण होऊ नये ही आपली आणि जिनपिंग दोघांचीही जबाबदारी असल्याचे बायडेन यांनी चर्चेपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या चर्चेदरम्यान बायडेन यांनी राजकीय शेरेबाजी केली नाही, याबद्दल जिनपिंग यांनी समाधान व्यक्त केले. बायडेन यांचीही अशी भूमिका नव्हती, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील संबंध साधे, सरळ आणि स्पर्धात्मक असावेत अशी अपेक्षा बायडेन यांनी व्यक्त केली. मानवी हक्क, अर्थकारण आणि भारत- प्रशांत क्षेत्रातील संबंध हे या चर्चेचे प्रमुख मुद्दे असल्याचेही ते म्हणाले.
चीन आणि अमेरिकेने एकमेकांचा आदर राखावा, शांततेने सहजीवन कायम राखावे आणि “विन-विन’ या सहकार्याच्या तत्वाचा अवलंब करावा अशी अपेक्षा जिनपिंग यांनी व्यक्त केली. हिंद- प्रशांत क्षेत्रातील चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे अमेरिकेसह इतर अन्य देशांनीही हीच अपेक्षा व्यक्त केली होती. चीन-अमेरिकेच्या संबंदांमध्ये सातत्यपूर्ण आणि विधायक प्रगती आवश्यक असल्याचे जिनपिंग म्हणाले. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये अनेक आव्हाने आहेत. ही आव्हाने दूर करण्यासाठी परस्पर संवाद आणि सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी बायडेन यांच्याशी एकवाक्यता निर्माण होणे गरजेचे असल्याचेही जिनपिंग म्हणाले.
चीन आणि अमेरिका हे दोन्ही देश विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावर आहेत. जागतिक खेड्यापुढे अनेक आव्हाने असताना प्रगती करण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा एकमेकांना पूरक भूमिका घ्यावी, असे जिनपिंग यांनी यावेळी सुचवले.
अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा
चीनने संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर दावा केला आहे. मात्र या समुद्रावर तैवान, फिलीपाईन्स, ब्रुनेई, मलेशिया आणि व्हिएतनाम या देशानीही दावा केला आहे. चीनने या समुद्रात कृत्रिम बेट उभारून तेथे लष्करी तळही उभे केले आहेत. पूर्व चीन समुद्रात जपानबरोबरही चीनचा वाद आहे. याशिवाय तैवान, हॉंगकॉंग, शिनजियांग आणि तिबेटच्या वादग्रस्त मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचा सहभाग असलेल्या “ऑकस’ आणि
अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा सहभाग असलेल्या “क्वॉड’ आघाडीबाबत चीनने चिंता व्यक्त केली.
व्यापारी युद्धाबाबतही साधक-बाधक चर्चा
अमेरिका आणि चीनमध्ये 2017 पासून व्यापारी तणाव आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकालापासूनच हे व्यापारी संबंध ताणले गेले होते. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी एकमेकांच्या आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर वर अब्जावधी डॉलरचा कर लादला आहे. याशिवाय अमेरिकेच्या बौद्धिक मालमत्तेची सायबर चोरी केल्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे. या दोन्ही संबंधांत दोन्ही नेत्यांनी आपल्या भूमिका आजच्या चर्चेदरम्यान स्पष्ट केल्या असल्याचे समजते आहे.