Covid -19 : अमेरिका तयार करतेय करोनाचा नायनाट करणारी ‘गोळी’; लवकरच बाजारात होणार उपलब्ध

वॉशिंग्टन – करोनाच्या विरोधात अनेक लसी तयार झाल्या आहेत. सर्वच देशांत लसीकरण सुरूही आहे. मात्र आता त्याहीपुढे जात करोना प्रतिबंधक गोळी अर्थात टॅब्लेट तयार करण्याचे काम अमेरिकेत सुरू असून त्याकरता अमेरिकेने 3 अब्ज डॉलर गुंतवणुकीची तयारी केली आहे.

ही गोळी जर बाजारात आली तर करोनाच्या समस्येला कायमचा पूर्णविराम दिला जाउ शकतो आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत गोळी बाजारात येण्याची शक्‍यता असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेचे संसर्ग रोग विषयक तज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, करोना लसीवर सरकारचे लक्ष आहेच. मात्र टॅब्लेटवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सध्या हे काम अगदी प्राथमिक स्वरूपात असले तरी त्यावर वेगात काम सुरू आहे. सरकारकडून मदत मिळाली त्याला आणखी गती येईल.

केवळ करोनाच नव्हे, तर भविष्यात अन्य कोणत्या विषाणूमुळे जर कोणती महामारी उदभवली तर त्यावर उपाय म्हणून अन्य औषधांच्या संदर्भातही संशोधन सुरू असल्याचे सांगण्यात आले. करोनाचा प्रसार झाल्यावर गेल्या केवळ वर्षभरात त्यावरची लस तयार करण्यात संशोधकांना यश आले. संशोधनासाठी तब्बल 18 अब्ज डॉलर खर्च करण्यात आल्याची माहितीही दिली जाते आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.