वॉशिंग्टन : एकीकडे अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले असताना भारतातही दिवसागणिक बाधितांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत भारतात वैद्यकीय सुविधांचा तुटवडा आहे. विशेषतः कोरोनाने अत्यवस्थ रुग्णांवर उपचारासाठी व्हेंटिलेटर्सची संख्याही भारतात कमी आहे. पण, ही चिंता काही अंशी दूर होण्याची चिन्हे आहेत.
सध्याच्या परिस्थितीत अमेरिका कोरोनाविरुद्ध लढत असला, तरीही व्हेंटिलेटर्सच्या रुपात भारताला मदत करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.
ही घोषणा करतानाच ट्रम्प म्हणाले, ‘अशा कठीण प्रसंगी आम्ही भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे आहोत. कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लस विकसित कार्यक्रमातही आम्ही एकमेकांना सहकार्य करत आहोत. आम्ही एकत्र मिळून या कोरोनारुपी अदृश्य शत्रूवर नक्कीच विजय मिळवू.भारतातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर पुरवठा करताना मला समाधान मिळत आहे,’ असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनावर उपचार करण्यासाठी काही दिवसांपूर्वी अमेरिकेने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी केली होती. या औषधाचा सर्वांत मोठा पुरवठादार देश असलेल्या भारताने ही मागणी तातडीने मान्य केली होती. त्यावर हे औषध मोठ्या प्रमाणात अमेरिकेला निर्यात करण्यात आले आहे.