नवी दिल्ली – अमेरिकेच्या ज्यो बायडेन प्रशासनाने सत्ता हस्तांतरणाच्या अगोदर कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी लागणार्या सेमी कंडक्टर चीपच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने रशियन क्रुड निर्यातीवर आणि या क्रुडची वाहतूक करणार्या जहाजावर निर्बंध घातले होते. त्यामुळे जागतिक शेअर बाजारावर परिणाम झाला होता.
आता अमेरिकेने घेतलेल्या निर्णयानुसार अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध बळकट ठेवण्यासाठी आणि अमेरिकेच्या सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विकासासाठी लागणार्या सेमीकंडक्टर चीप व इतर तंत्रज्ञान निर्यातीवर बंदी घातली आहे. या बंदीतून अमेरिकेने आपल्या 18 मित्र देशांना वगळले आहे. त्यामध्ये ब्रिटन, जपानचा समावेश आहे. तर चीन, रशिया, इराण, उत्तर कोरिया या देशांना हे तंत्रज्ञान मिळणार नाही याची काटेकर तपासणी केली जाणार आहे.
बायडेन यांनी घेतलेल्या या निर्णयावर अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करणार्या कंपन्यांनी टीका केली आहे. या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या कंपनीने चुकीच्या माहितीच्या आधारावर अमेरिकन प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. यामुळे अमेरिकेच्या या क्षेत्रातील संशोधन आणि विकासावर व स्पर्धात्मकतेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती या कंपनीने व्यक्त केली आहे.
चीनचे निमित्त करून अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. या निर्णयातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करणार्या कंपन्यांना वगळण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मे महिन्यापासून सुरू होणार आहे. नवीन डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला या विषयावर विचार करून या नियमात बदल करण्यासाठी 120 दिवस मिळणार आहेत.