वॉशिंग्टन : चीनमधील अलिपे आणि वुई चॅट सारख्या 8 ऍपच्या अमेरिकेतील वापरावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंदी घातली आहे. या ऍपच्या वापरावर बंदी घालण्याच्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. या ऍपमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे कारण देऊन ट्रम्प यांनी या ऍपवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचेच कारण देऊन भारताने आतापर्यंत चीनच्या 200 ऍपवर बंदी घातली आहे. भारताच्या या कृतीचे अनुकरण अमेरिकेने केले आहे.
अलिपे, कॅमस्केनर, क्यूक्यू वॉलेट, शेअर इट, टेंन्सेंट क्यूक्यू, व्हीमेट, वेचॅट पे आणि डब्ल्यूपीएस ऑफिस या 8 ऍपवर मंगळवारी घातलेली बंदी 45 दिवसात लागू केली जाणार आहे. हॉंगकॉंग, चीन, मकाउ येथून नियंत्रण असलेल्या ऍपच्या वापरामुळे अमेरिकेतील नागरीक, परराष्ट्र धोरणास, राष्ट्रीय हितास आणि अर्थकारणास बाधा पोहोचू शकते. या संभाव्य धोक्यापासून वाचण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक होते, असे ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना सांगितले.
ट्रम्प यांनी यापूर्वी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये “टिकटॉक’ आणि “वुई चॅट’च्या मुख्य ऍपवरदेखील बंदीचे आदेश दिले होते.