अमेरिकेत 1.9 लाख कोटी डॉलरच्या कोविड मदतनिधीस मंजूरी

वॉशिंग्टन – अमेरिकेतील संसदेने 1.9 लाख कोटी डॉलरच्या कोविड मदत निधीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. अध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी हा मोठा विजय मानला जात आहे. हा मदतनिधी प्रामुख्याने कोविड बाधित व्यक्‍ती, कोविडमुळे प्रभावित झालेले उद्योग, कोविडचा प्रादुर्भाव सर्वाधिक झालेल्या राज्ये आणि शहरांना पुरवला जाणार आहे. प्रतिनिधीगृहामध्ये 219-212 अशा फरकाने या मदतनिधीच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. किमान वेतनाबाबतच्या मागणीवर डेमोक्रॅटिक पक्षातील सदस्यांनी नमती भूमिका घेतली आहे. आता हे विधेयक सिनेटकडे मंजूरीसाठी पाठवले जाणार आहे.

करोनाच्या साथीमुळे अमेरिकेतील निम्म्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला आहे. जवळपास 5 लाख नागरिकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ताबडतोब, निर्णायक आणि ठोस आर्थिक उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. बायडेन यांनी अध्यक्षीय निवडणूकीच्या प्रचारादरम्यानही या मदतनिधीच्या पॅकेजचे जोरदार आश्‍वासन दिले होते.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत केले असले तरी रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी मार हे विधेयक खूपच महागाचे असल्याची टीका केली आहे. शाळा पुन्हा उघडण्यासाठी फारच थोडी आर्थिक तरतूद केली गेली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या ताब्यात असलेल्या कामगार संघटना आणि उद्योगांना या मदतनिधीचा अधिक फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. सिनेटमध्ये दोन आठवड्यात हे विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.