वॉशिंग्टन – अमेरिकेत करोनामुळे ज्या व्यावसायिकांना आणि नागरीकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तेथील सरकारने तब्बल 900 अब्ज डॉलर्सचे पॅकेज दिले असून त्या पॅकेजला अमेरिकन संसदेने त्वरेने मंजुरी दिली आहे.
वर्षाअखेरीच्या अनुषंगाने अमेरिकेने तब्बल 1.4 ट्रिलियन डॉलर्स खर्चाचे प्रस्ताव अमेरिकन कॉंग्रेसपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यात या 900 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजचा प्रस्ताव आहे. अमेरिकेतील बेरोजगारांना दर आठवड्याला 300 डॉलर्सचा भत्ता दिला जाणार असून प्रत्येक नागरीकांना 600 डॉलर्सचीही मदत दिली जाणार आहे.
करोनाच्या लॉकडाऊनचा फटका बसलेले सारे व्यावसायिक, हॉटेल व थिएटर चालक, शाळा, आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्था यांनाही आर्थिक मदत दिली जात आहे. ज्या घरमालकांना भाडेकरू गमवावे लागल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे त्यांनाही ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. विविध खर्चांच्या प्रस्तावांचा हा एकूण मसुदा 5593 पानांचा आहे.
अमेरिकेच्या अर्थ व्यवस्थेला चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या आर्थिक मदतीची तातडीची गरज असल्याचे अनेक घटकांकडून त्या सरकारला सांगितले जात होते. त्यामुळे या पॅकेजची तेथे बरीच प्रतिक्षा होती. अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष जो बायडेन यांनीही हे प्रस्ताव मंजुर व्हावेत यासाठी आपल्यापक्षाच्या सदस्यांना पाठिंबा देण्याची सुचना केली होती.