किव्ह – युक्रेनमधील युद्ध अंशतः थांबवण्याच्या मुद्यावर अमेरिका आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्ये आजपासून सौदी अरेबियामध्ये बैठक सुरू झाली. रशियाच्या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. रियाधमध्ये होत असलेल्या या बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यात अमेरिका आणि युक्रेनच्या प्रतिनिधींमध्येही चर्चा होणार असल्याचेही या वृत्तामध्ये म्हटले आहे.
दोन टप्प्यात होणाऱ्या चर्चेदरम्यान उर्जा प्रकल्पांवर आणि सार्वजनिक बांधकामांवर होत असलेले लांब पल्ल्यांचे हल्ले थांबवणे आणि काळ्या समुद्रातून होणाऱ्या व्यापारी जहाजांवरचे हल्ले थांबवण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियाच्या अध्यक्षांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांनी मर्यादित स्वरुपाच्या युद्धबंदीला बुधवारी तत्वतः मान्यता दिली आहे. मात्र ज्या ठिकाणी हल्ले होऊ नयेत, अशा ठिकाणांची वेगवेगळी यादी दोन्ही देशांनी समोर ठेवली आहे. रशियाने उर्जा प्रकल्पांवरचे हल्ले थांबवण्याची तयारी दाखवली. तर झेलेन्स्की यांनी रेल्वे आणि बंदरांवरही हल्ले होऊ नयेत, असे म्हटले आहे.
सौदी अरेबियात चर्चेला सुरुवात होण्यापुर्वी रशियाने संपूर्ण युक्रेनमध्ये ड्रोन हल्ले केले असून त्यात ७ ठार झाले आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी रशियावर अधिक दबाव आणणे गरजेचे असल्याचे झेलेन्स्की यांनी अमेरिका, युरोप आणि जगभरातील अन्य समविचारी देशांना उद्देशून म्हटले आहे.