अमेरिकेच्या विमानवाहू नौकांचे पथक दक्षिण चीन समुद्रात दाखल

तैपेई, (तैवान) – अमेरिकेच्या नौदलातील युएसएस थिओडोर रुझवेल्ट या विमानवाहू जहाजाच्या नेतृत्वाखाली विमानवाहू नौकांचा एक गट दक्षिण चीन समुद्रामध्ये दाखल झाला आहे. या समुद्राला चीनच्या तावडीतून सोडवण्यासाठी अमेरिकेने हे धाडसी पाऊल उचलले आहे. तैवान आणि चीनमधील तणाव वाढलेला असतानाच अमेरिकेने आपली विमानवाहू जहाजे दक्षिण चीन समुद्रात पाठवली आहेत, असे अमेरिकेच्या भारत-प्रशांत क्षेत्र विभागाने शनिवारी म्हटले आहे.

चीनच्या बॉम्बर आणि लढाऊ विमानांनी तैवानच्या प्रतास बेटाच्या जवळच्या हवाई संरक्षण क्षेत्रामध्ये घुसखोरी केल्याचा आरोप तैवानने शनिवारीच केला आहे.

दक्षिण चीन समुद्राच्या ज्या भागावर चीनने आपला अधिकार सांगितला आहे, त्याच भागात अमेरिकेच्या विमानवाहू नौकांनी प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या मित्र देशाच्या सागरी स्वातंत्र्याला अबाधित राखण्यासाठी विमानवाहू नौकांचा गट तैनात करण्यात आला आहे, असे स्ट्राइक गटाचे कमांडर रीअर ऍडमिरल डग वेरिसिमो यांनी सांगितले.

जगाचा सागरी मार्गाने होणारा दोनतृतीयांश व्यापार याच मार्गाने होतो. त्यामुळे या क्षेत्रातील अस्तित्व कायम राखणे गरजेचे आहे. नियमांवर आधारीत व्यवस्था राखण्यासाठी अमेरिकेच्या नौदलाला येथे उपस्थित राहणे आवश्‍यक आहे, असे वेरिसिमो यांनी सांगितले. दक्षिण चीन समुद्रावर चीनने सातत्याने हक्क सांगितला आहे. तसेच या समुद्रातील अमेरिकेच्या हालचालींनाही चीनने सतत आक्षेप घेतला आहे.

जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर चीनविरोधात संघर्षाची शक्‍यता निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.