वॉशिंग्टन: कोरोनाच्या प्रसारामुळे अमेरिकेत उद्योगधंद्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी अमेरिकन प्रशासनातर्फे दोन ट्रिलियन डॉलर्सचे पॅकेज तयार केले जात असल्याचे वृत्त आहे. याचा तपशील जवळपास निश्चित झाला आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री मंत्री स्टीव्हन म्युनचिन यांनी सांगितले की, अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी आमची याबाबत चर्चा झाली आहे. त्यातील बरेच मुद्दे आम्ही निकाली काढले असून जवळपास दोन ट्रिलियन डॉलर्सच्या पॅकेजवर अखेरचा हात फिरवला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हे सवलत पॅकेज तयार करण्यासाठी बरीच चर्चा संबंधितांमध्ये झाली. उद्या हे डिल फायनल होईल असे म्युनचिन यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले.
कोरोनामुळे जगभरातील बाजारपेठ बंद आहे. विमान कंपन्या आणि अन्य सारेच व्यवसाय बंद असल्याने त्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यातून या खासगी कंपन्या आणि उद्योगव्यवसाय सावरण्यासाठी अमेरिकन सरकारने त्यांना हा मदतीचा मोठा हात देण्याचे योजले आहे. कोरोनामुळे गेले पंधरा दिवस अमेरिकेत शटडाऊनची स्थिती आहे. त्यातून होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले. हे ऐतिहासिक सवलत पॅकेज असेल असे ते म्हणाले. दरम्यान, तिथेही अध्यक्ष ट्रम्प यांनी करोनाच्या बाबतीत अत्यंत ढिसाळपणे उपाययोजना राबवल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.