उरुल लघु पाटबंधाऱ्यांचे काम प्रगतीपथावर

आ. शंभूराज देसाईंची प्रकल्पाला भेट

243 हेक्‍टर क्षेत्र येणार ओलिताखाली

उरुल लघु पाटबंधारे बंधाऱ्यांची उंची 20.60 मीटर असून लांबी 660 मीटर आहे. या तलावामध्ये 1900 स.घ.मी. इतका पाणीसाठा अपेक्षित असून या तलावामुळे सुमारे 243 हेक्‍टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सद्यःस्थितीत बंधाऱ्याच्या कामांमध्ये भराव्याचे काम पूर्णत्वाकडे गेले असून आऊटलेट (पाणी सोडणे) गेटचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये रिंगरोडचे काम करावयाचे असून बुडीत क्षेत्रातला रस्ता व पूल उभारण्यासाठी निधी मंजूर असल्याने सदरचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे ठेकेदारानी आ. देसाई यांना सांगितले.

चाफळ – उरुल, ठोमसे व बोडकेवाडी या तीन गावाच्या हद्दीत असलेल्या उरुल लघू पाटबंधारे बंधाऱ्याचे काम भूसंपादन केलेल्या खातेदारांना भूसंपादनाची रक्कम मंजूर न झाल्याने बऱ्याच वर्षापासून रखडले होते. आ. शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा विषय मार्गी लावला असून या तलावाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली असून सदर बंधाऱ्याचे काम प्रगतीपथावर आले आहे. या कामाची आ. शंभूराज देसाई यांनी प्रत्यक्ष पहाणी केली. व सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करून या बंधाऱ्याची घळभरणी करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या.

या प्रकल्पातून पुढील पावसाळ्यात पाणीसाठा करण्याचे नियोजन करा तसेच शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील पाणी देण्यासंदर्भात बंदिस्त पाइपलाइनचा लवकरात लवकर सर्व्हे करा, अशाही सूचना आ. देसाई यांनी संबधित विभागाचे अधिकारी व बंधाऱ्याचे ठेकेदार यांना दिल्या. राज्याचे तत्कालीन जलसंधारणमंत्री ना. राम शिंदे यांचेकडे गतवर्षी पावसाळी अधिवेशनामध्ये आ. शंभूराज देसाई यांनी बैठक घेवून उरुल, ठोमसे व बोडकेवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेला विषय मार्गी लावला. आ. देसाईंच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे या तलावाच्या कामास 28 कोटी 32 लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या भूसंपदनाकरीता 6 कोटी 13 लाख 99 हजार रुपयांची रक्कम मंजूर करण्यात येवून भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंकखाती जमा करण्यात आली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बहुतांशी शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या रक्कमा बॅंक खाती जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आ. देसाई यांच्या हस्ते बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

उरुल लघु पाटबंधारे बंधाऱ्याचे कामास आ. देसाई यांच्या प्रयत्नामुळेच सन 2007 मध्ये 5 कोटी 90 लाख 09 हजार किंमतीस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. जलसंधारणमंत्री ना. राम शिंदे यांचेकडे गतवर्षी या विषया संदर्भात त्यांनी पुढाकार घेवून बैठक घेतल्याने शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा व प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा विषय मार्गी लागला आहे. बंधाऱ्याच्या कामास त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून 28.32 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली आहे. बंधाऱ्याचे बहूतांशी काम पुर्णत्वाकडे जात असल्याने प्रकल्पग्रस्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)