उरमोडीचे पात्र गेलं आटून, धरणग्रस्तांचे ऊर आले दाटून

धरणामध्ये जलसमाधी मिळालेल्या गावांचे अवशेष पाहून ग्रामस्थांची मनेही हेलावली

उरमोडीच्या पोटात चमत्कार

उरमोडी धरणाच्या पात्रात कातवडी गावातील बोअरवेल गेल्या 13 वर्षांपासून पाण्याखाली आहे. परंतु, आजही गंजलेल्या अवस्थेतील या बोअरवेलचे पंपिंग व्यवस्थित होत आहे. तर पुनवडी गावचे ग्रामदैवत असलेल्या हनुमानाच्या मंदिरातील हनुमानाची मूर्ती इतर वास्तूंचे फक्त अवशेष उरले असताना देखील त्याच ठिकाणी थोडीफार झिज झाली असली तरी सुस्थितीत आहे. 

ठोसेघर – दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या उरमोडी धरणाच्या पाणी पातळीत गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठी घट झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पोटात जलसमाधी मिळालेल्या गावांचे भग्न अवस्थेतील अवशेष उघडे पडले आहेत. ज्या गावात आयुष्यातील कित्येक चढ उतार, सुख दुःख, उत्सव डोळ्याने पाहिले, त्या गावाचे भग्न अवस्थेतील अवशेष पाहताना धरणग्रस्त गावकरी आणि परळी खोऱ्यातील ग्रामस्थांचा ऊर दाटून येत आहे.

दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या उरमोडी धरणाच्या कामाला 1997 ला सुरुवात झाली. 2003 साली धरणात पाणी साठवण करण्यात आले. तर 2009 ला धरण पूर्ण क्षमतेने भरले. दुष्काळी भागाला सुजलाम्‌ सुफलाम्‌ करण्याच्या हेतूने उरमोडी नदीवर उरमोडी धरण बांधण्यात आलं खरं परंतु, धरण क्षेत्रात येणाऱ्या नित्रळ, कातवडी, पुनवडी दहिवडी, रेवली, पोपळकरवाडी, चराचीवाडी, कामथी, यादववाडी, कासारस्थळ, बनघर, भानसेवाडी, आरगरवाडी, रोहोट, लुमणेखोल, वेणेखोल, आष्टे यांसह निसर्गाच्या कुशीत वसलेल्या अनेक गावांना आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून दुष्काळग्रस्त भागात अन्यायकारक पुनर्वसन स्वीकाराव लागलं. यातील काही गाव कालांतराने धरण क्षेत्राच्या वरच्या बाजूला सरकून वास्तव्य करू लागली.

मात्र गेल्या दहा वर्षांतील आजपर्यंतची धरणाच्या पाणी पातळीत सर्वात मोठी घट झाली असल्याने जलसमाधी मिळालेल्या गावांचे अवशेष दृष्टिक्षेपात येऊ लागले आहेत. उरमोडीच्या कोरड्या पात्रातील जलसमाधी मिळालेल्या गावांचे अवशेष पाहून धरणग्रस्त गावकऱ्यांच्या जखमा ओल्या झाल्या आहेत. आपल्या जुन्या घरादाराचे, गावातील मंदिर, शाळा, स्वतःच्या घामाने कसून पिकविलेल्या शेती यांसारख्या अनेक गोष्टींचे हृदयाच्या जवळ असलेल्या वास्तू आणि परिसराचे भग्न अवस्थेतील अवशेष पाहून काळजात धस्स होत आहे. वडीलधारी मंडळी आपल्या पोरबाळे आणि नातवंडांना घेऊन आपल्या जुन्या गावातील खाणाखुणा दाखवताना त्यांचा ऊर दाटून येत आहे. तर तरुण वर्ग आपल्या पूर्वजांनी वास्तव्य केलेल्या गावातील वास्तू आणि त्यांच्याबद्दल असलेल्या आठवणींचा वारसा ज्येष्ठांकडून कुतूहलाने समजावून घेत आत्मसात करत आहेत.

दुष्काळाने पुढं काय वाढून ठेवलंय हे माहीत नाही. परंतु, एवढं मात्र नक्की की एक दशकाच्यावर कालखंड लोटून आजही उरमोडी धरणग्रस्तांचे जुन्या गावांशी असलेली नाळ अजून तुटलेली नाही. उरमोडी धरणाने सामावून घेतलेल धरणग्रस्त गावकऱ्यांच जुनं वैभव आणि आठवणींचे भग्न अवस्थेतील अवशेष उघड्या डोळ्यांनी पाहताना जुन्या आठवणींनी सुवर्णकाळाच्या भूतकाळात नेलं खरं परंतु, त्यामुळे वर्तमानात भरलेल्या जखमा मात्र पुन्हा ताज्या झाल्या हेही तितकंच खरं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.