शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उर्मिलाकडून पूर्णविराम

कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचे केले स्पष्ट
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने मंगळवारी कुठल्याच राजकीय पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ती शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्‍यता असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

उर्मिलाने काही महिन्यांपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक कॉंग्रेसच्या तिकिटावर लढवली. मात्र, तिला उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी पराभूत केले. त्यानंतर कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय तिने 10 सप्टेंबरला जाहीर केला. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून ते पाऊल उचलत असल्याचे तिने त्यावेळी नमूद केले.

अवघ्या सहा महिन्यांत कॉंग्रेसला रामराम ठोकणाऱ्या उर्मिलाच्या भावी राजकीय वाटचालीबाबत तर्क-वितर्क सुरू होते. अशातच ती शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वृत्त पुढे आले. त्यामुळे ती शिवसेनेत प्रवेश करेल, अशा चर्चांना उधाण आले. मात्र, एक निवेदन जारी करत उर्मिलाने कुठल्याच राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे नमूद केले. प्रसारमाध्यमांनी ऐकीव गोष्टींकडे लक्ष देऊ नये. मी माझ्या मतांवर आणि विचारसरणीवर ठाम आहे. यापुढेही मी जनतेसाठी कार्यरत राहणार आहे, असेही तिने म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.