कर्जत,(वार्ताहर) – रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘शोध सुगरणीचा कोकणी खाद्य संस्कृतीचा’ कर्जत तालुकास्तरीय पाककला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत वदप येथील उर्मिला विचारे या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
या स्पर्धेत वदप येथील उर्मिला विचारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक अर्चना अंमराळे ( जांबरुख देवपाडा ), तृतीय क्रमांक रुपाली पालकर (वेणगाव) आणि कीर्ती देशमुख (कर्जत) यांना विभागून देण्यात आला. तसेच उत्तेजनार्थ प्रथम वैशाली आंबोळे (कर्जत) आणि उत्तेजनार्थ द्वितीय आरुषी चारी (नेरळ) यांनी पटकावला.
खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि सुधाकर घारे यांच्या माध्यमातून तालुकास्तरीय पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १८५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कर्जत मधील रॉयल गार्डनच्या सभागृहात पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्यातील महिलांनी कोकणात पिकणाऱ्या तांदूळ, नाचणी, वरी, मासे, नारळ, या पदार्थांपासून रुचकर असे पदार्थ बनवून आणले होते. परीक्षक म्हणून रेडिसन ब्ल्यूचे शेफ राजीव कुमार आणि संजय डाफडे यांनी काम पाहिले.