पोषण आहाराच्या धान्यात युरियासदृश दाणे

प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालात स्पष्टीकरण
धान्याची तपासणी करण्याचे पर्यवेक्षिकांना आदेश
दैनिक “प्रभात’ च्या वृत्तामुळे प्रशासनाला आली जाग 

नेवासे – नेवासे तालुक्‍यातील वरखेड येथील अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात टीएचआर म्हणून वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या धान्यात युरिया आढळून आला होता. त्याचा भांडाफोड “दैनिक प्रभात’ने केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंगळवारी या प्रकरणाचा चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला असून त्यात स्पष्टपणे युरिया सदृश दाणे आढळण्याचे म्हटले आहे. तसेच नेवासे तालुक्‍यात सर्वच पर्यवेक्षिकांना धान्य व किराणा तपासून त्याचा अहवाल देण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले आहे.

नेवासे तालुक्‍यातील वरखेड येथील अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात वाटप करण्यात आलेल्या टिएचआरच्या गव्हाच्या पिशवीत युरिया आढळून आला होता. याबाबत दैनिक “प्रभात”ने मंगळवारच्या अंकात पोषण आहराच्या धान्यात युरिया या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार मंगळवारी प्रकल्प अधिकारी सुनील अंकुश यांनी वरखेडला भेट दिली. दरम्यान, प्रभातच्या वृत्ताची जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागचे उपमुख्य कार्यकारी संजय कदम यांनी दखल घेवून प्रकल्प अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

प्रकल्प अधिकाऱ्यांनी वरखेड गावात चौकशी केली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा परिषद सदस्य तेजश्री लंघे, पंचायत समिती सदस्या सुषमा खरे, सरपंच वंदना कुंढारे, विलास इवले, पत्रकार सचिन दसपुते, कैलास कुंढारे, ज्ञानेश्वर इंगळे, भाऊसाहेब उंदरे यांनी भेट देऊन प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामा करण्यात आला होता. वरखेड येथे तीन अंगणवाडी आहेत यापैकी अंगणवाडी क्रमांक 85 मधील सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील 41 लाभार्थी असून गरोदर व स्तनदा 13 आहेत. यापैकी 25 लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले होते. यामध्ये सुवर्णा अमोल इवले, सिद्धांत विलास इवले यांना मिळलेल्या धान्याची सफाई करत असताना त्यात पांढरे दाणे आढळून आले. त्यांनी या पांढऱ्या दाण्याची चव घेऊन पाहिल्यावर त्यांना युरियाची चव असल्याचे त्यांनी सांगितले. या अंगणवाडीच्या भेटीच्या दरम्यान विठ्ठलराव लंघे यांनी गव्हाची एक पिशवी उघडून पाहिल्यावर त्यातही त्यांना पांढरे दाणे दिसले. यावेळी उपस्थित असलेले प्रकल्प अधिकारी अंकुश यांनी हा दाणे जिभेवर ठेऊन चव पहिली असता थंडगार स्पर्श जाणवला व हा दाणे लगेच विरघळून खारट चव लागली.

मूग डाळीचे पाकीट तपासले असता त्यातही मसूर डाळ दिसून आली. अंगणवाडीसेविका नंदा राजगुरू यांनी लाभार्थ्यांच्या घरी तत्काळ भेट देऊन पाहणी केली. त्यांनाही युरिया सुदृश दाणे आढळले असल्याचे या अहवाल म्हटले आहे. तालुक्‍यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांना मोबाईल संदेश देण्यात आला आहे की सर्व माता बैठकीत तपासणी करून काही गैर आढळल्यास वाटप करू नये तसेच तत्काळ अहवाल कार्यालयास पाठवून त्यानंतरच धान्य वाटप करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.

अंगणवाडी क्रमांक 85 वरखेड येथील माल खराब धान्य पुरवठा करणाऱ्याबाबत कार्यवाही करण्याचे अहवालात आदेश देण्यात आले आहेत. प्रकल्पधिकाऱ्यांनी हा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. त्या अहवालात स्पष्टपणे गव्हाच्या धान्यात युरिया सदृश दाणे आढळल्याचे म्हटले आहे. मात्र अन्य कडधान्याच्या पिशव्यामध्ये भेसळ आढळून न आल्याचे म्हटले आहे. आता या अहवालावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)