पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून (वर्ष २०२०-२१) एक वर्षाचा उर्दू फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात येणार आहे. दहावी, बारावी, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेली व्यक्ती त्याच्या प्रवेशासाठी अर्ज करू शकते.
या अभ्यासक्रमाद्वारे उर्दू वाचन, उर्दू लेखन, उर्दू श्रवण, उर्दू संभाषण अशी चार कौशल्ये शिकता येणार आहेत. या अभ्यासक्रमांचे प्रवेश विद्यापीठाच्या नियमानुसार होणार आहेत. प्रत्येक बॅच ही ३० जणांची असेल. सध्या हे अभ्यासक्रम हिंदी विभागांतर्गत चालवले जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती योग्य वेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल, अशी माहिती हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांनी दिली.
या कोर्सबाबत पुण्यातील अॅड. सलीम शेख यांनी पाठपुरावा केला. त्याला कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. या समितीत डॉ. अझमत दलाल, प्रा. अब्दुल बारी, श्रीमती उझ्मा तसनीम तसेच, निमंत्रित म्हणून अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे यांचा समावेश होता. या समितीने अभ्यासक्रमाची रचना ठरवली. त्यानुसार आता हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
हा कोर्स सुरू करण्याचा पाठपुरावा करण्यामध्ये अब्दुल करीम अत्तार, सय्यद रियाझुद्दीन, इम्तियाझ शेख यांचाही सहभाग होता, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.
उर्दू ही सुसंस्कृत आणि सभ्य भारतीय भाषा आहे. ती भारतीय सांस्कृतिक क्षेत्राचा महत्वाचा घटक आहे. सद्यस्थितीत भारतीय समाजाचे अधिक चांगल्या प्रकारे अवलोकन करण्यासाठी ही भाषा शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उर्दू अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रा. नितीन करमळकर यांनी दिली.