रुग्णालयांकडे जबाबदारी : गर्दी टाळण्यासाठी निर्णय
पुणे – शहरी गरीब योजना सभासद नोंदणीसाठी पालिका मुख्य इमारतीत गर्दी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन या योजनेंतर्गत ज्या रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. त्या रुग्णालयातच या योजनेची नोंदणी होणार आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तीने आवश्यक कागदपत्रे रुग्णालयात सादर करायची आहेत. तर, या योजनेंतर्गत जे रुग्ण औषधे घेतात त्यांची नोंदणी मात्र पालिकेत होणार आहे.
महापालिकेकडून आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांसाठी शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना राबविली जाते. याअंतर्गत एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणि संबंधित व्यक्ती शहरातील रहिवासी असल्यास 1 लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार करण्यासाठी मदत दिली जाते. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते.
योजनेचा सभासद सदस्याला प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावे लागते. पालिकेने मागील वर्षाच्या कार्डला करोनामुळे 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यामुळे ती संपल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य विभागात सभासदत्व नोंदणीसाठी गर्दी झाली. तर, सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नव्हते. त्यामुळे करोना प्रसार होण्याची भीती व्यक्त होत होती. ही बाब लक्षात येताच आरोग्य विभागाने तातडीने या योजनेची नोंदणी थेट रुग्णालयातच करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी या योजनेच्या पॅनेलवर असलेल्या रुग्णालयांना पालिकेकडून आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून दिली. त्यामुळे कार्डच्या नोंदणीसाठी पालिकेत येणाऱ्यांची गर्दी कमी झाली आहे.
8 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा
आरोग्य विभागात शहरी गरीब योजनेचे काम करण्यात येत असलेल्या खोलीतील 8 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेत या योजनेचे सभासदत्व नूतनीकरणासाठी येणारे बहुतांश नागरिक हे प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे आहे. त्यामुळे कार्डसाठी आलेल्या व्यक्तींकडूनच हा संसर्ग झाल्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात आली. त्यामुळे खबरदारी म्हणून या विभागात सुरक्षा साधने तसेच लोकांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही, अशाप्रकारे व्यवस्था केली आहे.