नवी दिल्ली: देशभर पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने या महिन्याच्या अखेरीला नियोजित असलेली प्राथमिक परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 31 मे रोजी होणार होती. मात्र लॉकडाऊनमुळे लागू असलेल्या निर्बंधांना मुदतवाढ दिली गेल्यामुळे परीक्षा घेणे शक्य होणार नाही. तसेच उमेदवारांनाही या परीक्षेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे “यूपीएससी’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
“यूपीएससी’ अंतर्गत भारतीय वनसेवेतील पदांसाठीची निवड चाचणी देखील होणार असल्याने या परीक्षेचे नियोजित वेळापत्रक देखील पुढे ढकलण्यात आले आहे. देशातील करोनाच्या साथीशी संबंधित परिस्थितीचा आढावा 20 मे रोजी घेण्यात येईल आणि त्यानंतर या परीक्षांसाठीच्या नवीन तारखांची घोषणा केली जाईल. या तारखा ‘यूपीएससी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील, असेही निवेदनात म्हटले आहे.
देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 43 हजारांच्या पुढे गेली असून आतापर्यंत 1,300 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.