नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या एका होतकरू उमेदवार तरुणीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. मध्य दिल्लीतील राजेंद्र नगर भागात हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. “युपीएससी’च्या प्राथमिक फेरीची परीक्षा रविवारी होणार आहे. त्यापूर्वीच या विद्यार्थिनीने हे पाऊल उचलले आहे.
आकांक्षा मिश्रा असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. ती मूळची उत्तर प्रदेशातील भादोही येथील रहिवासी होती. याच वर्षी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती दिल्लीमध्ये रहायला आली होती. 2 ऑक्टोबरपासून जुन्या राजेंद्रनगर भागात ती भाड्याच्या घरात रहायला आली होती.
तिच्याबरोबर राहणाऱ्या मुलींनी सकाळी 11 वाजता आकांक्षाला पाहिले होते. मात्र त्यानंतर 11 वाजून 50 मिनिटांनी आंकांक्षाने पंख्याला गळफास घेतल्याचे उघड झाले, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. घराचा दरवाजा आतून बंद केलेला होता. घटनास्थळी कोणतीही स्युसाईड नोट आढळून आली नाही, असे सहायक पोलीस आयुक्त (मध्य दिल्ली) श्वेता चौहान यांनी सांगितले. या मुलीच्या पालकांना याबद्दल कळविण्यात आले आहे.